समस्त गोमंतकीयांचा गैरसमज दूर व्हावा : काळय़ा-पिवळय़ा टॅक्सीचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी /वास्को
मुरगाव बंदरात मागच्या गुरूवारी विदेशी पर्यटकांच्याबाबतीत घडलेल्या घटनेशी काळय़ा-पिवळय़ा टॅक्सी व्यवसायिकांचा कोणताही संबंध नाही. ती घटना पर्यटक टॅक्सी व्यवसायिक, पर्यटक आणि टूर ऑपरेटर्स यांच्यामध्ये घडली होती. काळय़ा-पिवळय़ा टॅक्सी व्यवसायिकांनी कधीही पर्यटकांशी किंवा इतर प्रवाशांशी गैरव्यवहार केलेला नाही, असे दाबोळी विमानतळावरील युनायटेड टॅक्सीमेन्स असोसिएशनचे सरचिटणीस प्रसाद प्रभुगावकर यांनी प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे.
मुरगाव बंदरातील क्रूझ टर्मिनलवर घडलेल्या घटनेनंतर टॅक्सीवाल्यांचीच चर्चा गोव्यात पसरलेली असून टॅक्सी त्यामुळे सर्वच व्यवसायिकांची बदनामी होत असताना दिसत आहे.
पर्यटक टॅक्सीशी काहीही संबध नाही
त्या घटनेशी काळय़ा-पिवळय़ा टॅक्सी व्यवसायिकांचा काडीचाही संबंध नाही. लोकांनी गैरसमज करून घेऊ नये. पर्यटक टॅक्सी व्यवसायिक आणि काळय़ा-पिवळय़ा टॅक्सी व्यवसायिक यांच्यात कसलाही संबंध नाही. वास्कोसह संपूर्ण मुरगाव तालुक्यातील काळय़ा-पिवळय़ा टॅक्सी दाबोळी विमानतळावर व्यवसाय करीत असून त्यांना सरकारने स्टॅण्ड दिलेले आहे. अधिकृत काऊन्टरच्या माध्यमातून हा टॅक्सी व्यवसाय चालतो.
कधीही कुणाला लुटलेले नाही
काळय़ा पिवळय़ा टॅक्सी व्यवसायिकांनी कधी कुणालाच लुटलेले नाही. किंवा कुणा ग्राहकाकडे गैरवर्तन केल्याच्या तक्रारी आलेल्या नाहीत. टॅक्सी प्रवासाचा दर सरकारने ठरवलेला आहे. सरकारच्याच दरानुसार काळय़ा पिवळय़ा टॅक्सी व्यवसायिकांचा व्यवसाय चालतो. कुणाला लुटण्या, लुबाडण्याचा व फसवण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे प्रसाद प्रभुगावकर यांनी म्हटले आहे.