संशयास्पद ड्रोनच्या हालचालीनंतर कठुआमध्ये शोधमोहीम
जम्मू / वृत्तसंस्था
जम्मू आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानातून ड्रोनमधून शस्त्रपुरवठा होत असल्याच्या घटना वारंवार निदर्शनास येत आहेत. येथील सुरक्षा जवानांनी सकाळी सीमेजवळून काही शस्त्रे आणि दारुगोळा जप्त केल्याची माहिती अधिकाऱयांनी गुरुवारी दिली. तुरुंगात असलेल्या लष्कर-ए-तोयबा कमांडरने दिलेल्या माहितीच्या आधारे शस्त्रे जप्त करण्यात आली. बॉम्ब निकामी पथकाने शस्त्रांचे पॅकेट उघडले असता त्यात एक एके-रायफल, एक मॅगझिन, 40 राउंड, एक पिस्तूल, दोन पिस्तूल मॅगझिन, 10 राउंड आणि दोन ग्रेनेड असल्याचे आढळून आल्याचे एडीजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले.
सीमावर्ती भागातील काही रहिवाशांनी त्यांना संशयित ड्रोन हालचालीबद्दल माहिती दिल्यानंतर अधिकाऱयांनी जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिह्यात शोधमोहीम सुरू केली आहे. बुधवारी रात्री मारहीन भागातील रहिवाशांनी ड्रोनच्या संशयास्पद हालचालीची माहिती दिली. शोधमोहीम सुरू झाल्यापासून दुपारपर्यंत परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटके आढळली नव्हती.