जम्मू-काश्मीर पोलिसांच्या हाती मोठे यश : सांबा येथे कारवाई
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांना पुन्हा मोठे यश मिळाले आहे. सीमेपलीकडून ड्रोनद्वारे पाठवण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांची खेप पोलिसांनी जप्त केली आहे. सांबाच्या विजयपूर परिसरात सापडलेल्या ड्रोनमध्ये दोन पिस्तूल, 5 लाख रुपयांची रोख रक्कम, एक स्फोटक पिन, एक घडय़ाळ आणि आयडी कंडक्टरचा समावेश आहे. आयडीसोबत जोडलेले आरडीएक्स असलेले स्फोटक फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सीमेपलीकडून सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत. ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रांची खेप पाठवली जात आहे. मात्र, सतर्क असलेल्या सुरक्षा यंत्रणांकडून सातत्याने अशा खेपा पकडल्या जात आहेत. पोलिसांनी दहशतवाद्यांचा डाव यशस्वी होऊ दिला नसल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले. या कारवाईमध्ये स्थानिक लोकांचीही मदत होत आहे. स्थानिकांच्या मदतीने ड्रोन्सवर कारवाई करण्याबरोबरच शस्त्रे जप्त करण्यात येत आहेत.