मल्टिस्पेशालिटीचे काम पूर्ण, येत्या आठवडय़ात होणार उद्घाटन
प्रतिनिधी/ बेळगाव
महांतेशनगर येथील पशुसंगोपन खात्याच्या मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटलचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. त्यामुळे येत्या आठवडय़ात सन्मान हॉटेल जवळील पशु वैद्यकीय दवाखान्याचे स्थलांतर होणार आहे. मे च्या पहिल्या आठवडय़ात या सुसज्ज हॉस्पिटलचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर पशुवैद्यकीय सेवा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
अलीकडे जनावरांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्हय़ात तब्बल 28 लाख अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामुळे जनावरांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी महांतेशनगर येथे सुसज्ज असे मल्टि स्पेशालीटी हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. या दवाखान्याचे काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी विविध सुविधा आणि लहान शस्त्रक्रिया देखील केल्या जाणार आहेत. तसेच लॅब देखील उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे जनावरांच्या दुर्मिळ आजारांचे निदान होण्यास मदत होणार आहे.
जिल्हय़ात गायी, म्हशी, बैल, घोडा, गाढव, शेळय़ा, मेंढय़ा, डुक्कर, मांजर, कुत्रा आदी पाळीव जनावरांची संख्या वाढली आहे. मात्र त्या तुलनेत पशु वैद्यकीय दवाखाने आणि डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळे जनावरांना वेळेत उपचार देताना अडचणी येतात. एकाच ठिकाणी विविध सुविधा पुरविण्यासाठी महांतेशनगर येथे दवाखाना उभारण्यात आला आहे. या ठिकाणी अत्याधुनिक मशिन, साहित्य, व इतर सुविधा पुरविल्या गेल्या आहेत. या इमारतीचे काम काही दिवस कोरोना आणि इतर कारणांनी लांबणीवर पडले होते. मात्र आता इमारतीतील अंतर्गत कामाबरोबर फरशी, इलेक्ट्रिक कामेही पूर्ण झाली आहेत. त्याबरोबर जनावरांवरती उपचार करण्यासाठी बाहेर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पशु वैद्यकीय डॉक्टरांनाही सुविधा देणे सोयीस्कर होणार आहे.
महांतेशनगर येथे मल्टि स्पेशालीटी जनावरांचे हॉस्पिटल झाल्याने सर्व पाळीव जनावरांवर एकाच ठिकाणी उपचार होणार आहेत. विशेषतः शस्त्रक्रिया आणि रक्त तपासणी यासह इतर मोठय़ा आजारावर देखील उपचार होणार आहेत. त्यामुळे पशुपालकांना देखील हा दवाखाना आधार ठरणार आहे.