बेनामी वा माहितीविना विक्री होत असल्याचे उघड : ग्राहकांनी जागरूक राहण्याचे खात्याकडून आवाहन
प्रतिनिधी /पणजी
वजनमाप खात्याने राज्यभरात हाती घेतलेल्या मोहिमेत आयातीची तारीख, कमाल किरकोळ किंमत यासारखी अनिवार्य माहिती नसलेल्या कोट्यावधी ऊपये किंमतीच्या आयात आणि भारतात उत्पादित विदेशी बनावटीच्या (आयएमएफएल) मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
वजनमाप खाते (पॅकेज्ड कमोडिटीज) कायद्याच्या 2009 च्या तरतुदी अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत सासश्टी, मुरगाव आणि बार्देस तालुक्यात अनेक आस्थापनांवर धाडी घालून मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त करण्यात आला.
खात्याचे दक्षिण विभाग-1 मडगाव, साहाय्यक नियंत्रक नितीन पुरूषन आणि सेंट्रल झोन, पणजीचे साहाय्यक नियंत्रक देमू मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर तिन्ही तालुक्यातील अधिकाऱ्यांनी या कारवाईत सहकार्य केले.
त्यात प्रामुख्याने गुलाम गुलबर्ग, भूपेंद्र देसाई, अझेन रॉड्रिग्स, विकास कांदोळकर, राजेश वेंगुर्लेकर, सिद्धेश शिरगावकर यांचा समावेश होता.
दरम्यान, ही मोहीम यापुढेही चालूच ठेवण्यात येणार असून वनजमाप कायदा आणि नियमांच्या तरतुदीचे काटेकोर पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या कायद्यानुसार ग्राहकांच्या हिताचे रक्षण होणे अत्यावश्यक आहे. त्या भावनेतूनच ’जागो ग्राहक जागो’ ही जागृती मोहीम राबविण्यात येत असून राज्यातील सर्व सुपरमार्केट, मेगास्टोर्स, वितरक आणि आयातदार यांनी याची नोंद घ्यावी असे सूचित करण्यात आले आहे.
असे मद्य किंवा कोणतीही पॅकेज्ड खाद्यपदार्थ, वस्तू खरेदी करताना ग्राहकांनी दक्षता बाळगली पाहिजे. त्यासाठी खरेदी करण्यापूर्वी संबंधित वस्तूचे सामान्य नाव, उत्पादकाचे नाव, कार्यालयाचा पूर्ण पत्ता, ईमेल, संपर्क क्रमांक, आयात वस्तुचा मूळ उत्पादक देश, उत्पादनाची संपूर्ण तारीख, कमाल किरकोळ किंमत, यासारखी माहिती छापलेली आहे याची खात्री करावी, असे खात्यातर्फे सूचविण्यात आले आहे.