बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे तिसरे अविस्मरणीय यश
बर्मिंगहम / वृत्तसंस्था
वेटलिफ्टर अचिंता शेऊलीने (73 किलोग्रॅम) भारताला बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत तिसरे सुवर्ण जिंकून दिले. सदर इव्हेंट जिंकण्यासाठी प्रबळ दावेदारांमध्ये गणल्या गेलेल्या अचिंताने 313 किलोग्रॅम (143 किलो व 170 किलो) वजन उचलत अव्वलस्थान काबीज केले. मलेशियाच्या इरी हिदायत मोहम्मदने त्याला काटय़ाची टक्कर देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, अचिंताने यानंतरही निर्णायक क्षणी बाजी मारली.
मलेशियाच्या इरीला 303 किलोग्रॅम (138 व 165 किलोग्रॅम) वजन उचलता आले. कॅनडाचा शॅड दॅर्सिग्नीने 298 किलोग्रॅम (135 व 163 किलोग्रॅम) वजन उचलत तिसरे स्थान मिळवले.
‘या पदकासाठी मी बरीच मेहनत घेतली. त्यामुळे, आजचा क्षण विशेष सुखावणारा आहे. हे यश मिळवता आले, यासाठी माझ्या आजवरच्या वाटचालीत ज्यांनी सहकार्य दिले, त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. आजचे पदक मला विशेष प्रेरणा देणारे असेल. यापुढे मला मागे वळून पहावे लागणार नाही, याची खात्री वाटते’, असे शेऊली याप्रसंगी म्हणाला.
‘हृदयविकाराने कालवश झालेल्या माझ्या वडिलांना मी हे पदक समर्पित करु इच्छितो. माझ्या जडणघडणीत माझ्या भावाचा मोलाचा वाटा राहिला. माझे प्रशिक्षक विजय शर्मा हे तर एखादी चूक झाल्यानंतर हक्काने माझी खरडपट्टी काढत असे. यामुळेच मी इथवर पोहोचू शकलो’, याचाही त्याने उल्लेख केला.
ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील रौप्यजेता शेऊलीने स्नॅच विभागात 137 कि., 140 कि. व 143 असे तीन क्लीन लिफ्ट नोंदवले. त्याचे 143 किलोग्रॅमचे लिफ्ट नवा स्पर्धा विक्रम नोंदवणारे ठरले. शिवाय, यामुळे त्याला वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीतही सुधारणा करता आली. पाच किलोग्रॅमचे ऍडव्हान्टेज घेऊन पुढील फेरीत क्लीन अँड जर्कमध्ये शेऊलीने 166 किलोग्रॅम लिफ्टसह शानदार सुरुवात केली. पुढे 170 किलोग्रॅम लिफ्ट पूर्ण करता आले नाही. मात्र, यादरम्यान त्याने 313 किलोग्रॅम लिफ्टचा नवा स्पर्धा विक्रम नोंदवला.
मलेशियन प्रतिस्पर्धी इरीने शेवटचे दोन प्रयत्न निष्फळ घालवले आणि त्यानंतर शेऊलीच्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. क्लीन व जर्कमधील शेवटच्या लिफ्टपूर्वी प्रशिक्षक शर्मा यांनी संयमाने लिफ्ट करण्याचा दिलेला सल्ला महत्त्वाचा ठरला, असे शेऊली याप्रसंगी म्हणाला. शेऊलीचे सुवर्ण भारतीय वेटलिफ्ंिटग पथकासाठी या स्पर्धेतील एकूण 6 वे पदक ठरले.
अजयचे पदक हुकले
स्नॅचमधील अपेक्षाभंग आणि क्लीन अँड जर्क लिफ्टमधील गोंधळामुळे अजय सिंगचे 81 किलोग्रॅम वजनगटातील पदक अगदी किंचीत फरकाने हुकले. 25 वर्षीय अजय सिंगने 319 किलोग्रॅम (143 व 176 किलोग्रॅम) वजन उचलले. मात्र, त्याला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. या इव्हेंटमध्ये इंग्लंडच्या ख्रिस मरेने 325 किलोग्रॅम (144 व 181 किलोग्रॅम) वजन उचलत सुवर्ण, ऑस्ट्रेलियन लिफ्टर काईल ब्रूसने 323 किलोग्रॅम (143 व 180 किलोग्रॅम) वजनासह रौप्य तर कॅनडाच्या निकोलसने 320 किलोग्रॅम (140 व 180 किलोग्रॅम) वजनासह कांस्यपदकावर आपली मोहोर उमटवली.
कोट्स
जेरेमी लालरिन्नुंगा व अचिंता शेऊली यांनी सुवर्ण जिंकून देत भारताला जागतिक नकाशात नव्या उंचीवर नेले. या यशाबद्दल त्यांचे खास अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीबद्दल मनापासून शुभेच्छा.
-तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन
नजाकत आणि ताकद! अचिंताची झेप एम्ब्रॉयडरीपासून राष्ट्रकुल पोडियमपर्यंत!
पश्चिम बंगालमधील पंचलानजीक वसलेले देऊलपूर हे 12 हजार लोकवस्तीचे छोटेसे खेडे रविवारी मध्यरात्रीपर्यंत फारसे प्रकाशझोतात नव्हते. असण्याचे कारणही नव्हते. पण, अचिंता शेऊलीने सुवर्ण जिंकताच देऊलपूरचा गुगलवर शोध घेतला जाऊ लागला. 20 वर्षीय अचिंता रहिवासी असलेले हे खेडे एम्ब्रॉयडरीसाठी प्रसिद्ध आहे.
अचिंताला उमजू लागले, त्याचवेळेपासून गुजराण करण्यासाठी एम्ब्रॉयडरी करावी लागत असे. यातून जी मिळकत होत असे, त्यातून तो वेटलिफ्ंिटगसाठी लागणाऱया आहाराचा खर्च भागवत असे. सकाळी 6.30 वाजता झारी काम सुरु केल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत तो त्यातच व्यस्त राहत असे. अचिंताचे वडील ट्रॉली रिक्षा चालवत असत आणि 2013 मध्ये त्यांचे हृदयविकाराने निधन झाले, त्यावेळी अचिंता केवळ 11 वर्षांचा होता.
‘वडिलांच्या निधनाने आमचे अख्खे कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाले. आम्हाला एम्ब्रॉयडरी करणे भाग हेते. माझी आई पूर्णिमा देखील एम्ब्रॉयडरी करत असे’, असे तो म्हणाला.
मकर संक्रांतीला पतंग उडवणे आणि आसपासच्या रस्त्यावर पडलेले पतंग गोळा करणे, यात विशेष स्वारस्य असणारा अचिंता वेटलिफ्टिंगकडे कसा वळला, हे देखील लक्षवेधी आहे. तो एका पतंगाच्या शोधात मोठा भाऊ अलोक कसरत करत असलेल्या व्यायामनगरात पोहोचला. तेथील वातावरण, कसरती अचिंताला कमालीचे प्रभावित करुन गेले आणि त्यानंतर दुसऱया दिवसापासूनच अचिंताने वेटलिफ्टिंगमध्ये कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला!