वृत्तसंस्था / बहरीन
मनामा येथे सुरू असलेल्या 2022 आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत सोमवारी पुरुष विभागात 67 किलो वजन गटात भारताचा वेटलिफ्टर तसेच राष्ट्रीय विजेता तारिओ मार्किओचे आव्हान पदकविना समाप्त झाले.
पुरुषांच्या 67 किलो वजन गटात मार्किओने स्नॅचमध्ये 123 किलो तर क्लिन आणि जर्कमध्ये 158 किलो असे एकूण 281 किलो वजन उचलत तो सहाव्या स्थानावर राहिला. अंतिम फेरीसाठी एकूण 9 स्पर्धकांचा समावेश होता. मार्किओने गेल्या मार्चमध्ये झालेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविताना स्नॅचमध्ये 128 तर क्लिन आणि जर्कममध्ये 158 असे एकूण 286 किलो वजन उचलले होते. आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत उझ्बेकचा वेटलिफ्टर इरगेशेव्हने स्नॅचमध्ये 138 तर क्लिन आणि जर्कमध्ये 176 किलो असे एकूण 314 किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकाविले. इंडोनेशियाच्या मोहमद यासीनने एकूण 303 किलो वजन उचलत रौप्य तर थायलंडच्या अनुचा डोंगसेरीने एकूण 301 किलो वजन उचलत कांस्यपदक मिळविले.
यावर्षी होत असलेल्या खंडीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताच्या हर्षदा गरुडने महिलांच्या 45 किलो वजन गटात एकमेव कांस्यपदक मिळविले आहे. हर्षदा गरुड ही कनिष्ठ विश्व वेटलिफ्टिंग स्पर्धेतील विद्यमान विजेती आहे. हर्षदाने महिलांच्या 45 किलो वजन गटात स्नॅचमध्ये 68 तर क्लिन आणि जर्कमध्ये 84 किलो असे एकूण 152 किलो वजन उचलत भारतला कास्यपदक मिळवून दिले. हर्षदाचे वरिष्ठ गटात सहभागी झाल्यानंतरचे हे पहिले पदक आहे. या स्पर्धेत भारताची ऑलिम्पिक पदक विजेती मिराबाई छानू सहभागी झाली नाही. मिराबाईने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक तसेच 2022 च्या बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या जेरेमी लालरिनूनगा आणि अचिंता शेउली यांनी सुवर्णपदक पटकाविले होते. आशिया वेटलिफ्टिंग स्पर्धा 16 ऑक्टोबरला समाप्त होणार आहे.