गालात घुसवून घेतात तलवार आणि धातूच्या वस्तू


भारतात नवरात्रोत्सव अलिकडेच संपुष्टात आला आहे. तसेच दसऱयाच्या स्वरुपात असत्यावरील सत्याच्या विजयाचा उत्सवही साजरा करण्यात आला आहे. परंतु भारतापासून काही अंतरावर असलेल्या थायलंडमध्येही एक 9 दिवसांचा सण साजरा करण्यात येत असून तो अत्यंत अनोखा आहे आणि प्रथेप्रकरणी अत्यंत विचित्र आहे. या सणावेळी लोक स्वतःच्या गालात छिद्र करून घेतात.


नाइन एंपरर गॉड्स फेस्टिव्हल किंवा व्हेजिटेरियन फेस्टिव्हल थायलंडच्या फुटकेमध्ये 9 दिवसांपर्यंत साजरा करण्यात येतो. सध्या हा उत्सव सुरू असून सोशल मीडियावर याची छायाचित्रे अन् चित्रफिती चर्चेत आहेत. कुणाच्या तोंडात लोखंडी सळी तर कुणाच्या तोंडात लाकडी काठी दिसून येते. सणाच्या अखेरच्या दिवशी लोक निखाऱयांवर चालताना दिसून येतात.


150 वर्षे जुनी प्रथा
थायलंडमध्ये राहणारे चिनी समुदायाचे लोक या उत्सवात सहभागी होतात. चिनी दिनदर्शिकेच्या 9 व्या लूनर महिन्यात हा सण साजरा केला जातो आणि याची सुरुवात 150 वर्षांपूर्वी झाली होती. त्या काळात चिनी ऑपेराशी जोडले गेलेले लोक थायलंडमध्ये आले होते, परंतु काही कारणामुळे थायलंडमध्ये ते आजारी पडले होते. प्रकृती बरी होईपर्यंत या लोकांनी केवळ शाकाहार घेत एंपरर गॉड्सची पूजा केली होती.


तेव्हापासून या लोकांनी हा सण साजरा करण्यास सुरुवात केली. उत्सवाच्या 9 दिवसांमध्ये लोक मद्य, मांसाचे सेवन करणे टाळतात. चेहऱयात लोखंडी सळी घुसवून घेत स्वतःच्या पापांचे प्रायश्चित केले जाते. गालांमध्ये छिद्र पाडून घेत स्वतःमधील वाईट वृत्ती संपविण्याची आणि स्वतःच्या गुन्हय़ांबद्दल देवांसमोर प्रायश्चित करण्याची ही पद्धत असल्याचे या लोकांचे मानणे आहे.

