प्रतिनिधी/ बेळगाव
भारत गौरव उपक्रमांतर्गत काशी दर्शन यात्रा एक्स्प्रेस शनिवारी बेंगळूर येथून सुरू करण्यात आली. या एक्स्प्रेसचे मध्यरात्री बेळगावमध्ये आगमन झाले. नागरिकांनी एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी रेल्वे इंजिनची पूजा करण्यात आली.
बेंगळूर-बनारस-बेंगळूर या मार्गावर काशी दर्शन एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. काशी दर्शन रेल्वे वाराणसी, अयोध्या, प्रयागराजसह इतर धार्मिक स्थळांना भेटी देणार आहे. भाविकांना सोयीच्या दरात काशी दर्शन व्हावे, या उद्देशाने धर्मादाय खात्याच्यावतीने रेल्वे विभागाच्या सहयोगाने काशी दर्शन उपक्रम राबविण्यात आला. एकूण 20 हजार रुपये तिकीट दर असून त्यापैकी 5 हजार रुपयांचे अनुदान धर्मादाय खात्याकडून दिले जाणार आहे.
दुपारी बेंगळूर येथून निघालेली ही एक्स्प्रेस रात्री 1.10 वा. बेळगाव रेल्वेस्थानकात पोहोचली. अनेक प्रवासी बेळगावमधून काशी दर्शनला जाणार असल्याने रेल्वेस्थानकात गर्दी झाली होती. हर हर महादेव, जय श्री राम अशा घोषणांनी परिसर दणाणला होता. उपस्थित भाविकांनी रेल्वे इंजिनचे पूजन करून हार घातले. तसेच मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी मोठय़ा संख्येने प्रवासी उपस्थित होते.