पंतप्रधान नरेंद्र मोदी ः बेंगळूरमधील ‘इन्व्हेस्ट कर्नाटक-2022’चे व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन
प्रतिनिधी/ बेंगळूर
भांडवल गुंतवणूकदारांचे ‘रेड कार्पेट’ घालून स्वागत करावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारला दिला. गुंतवणूकस्नेही वातावरणनिर्मिती करून अर्थव्यवस्था वृद्धीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आपले सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे. आपल्या सरकारने 1,500 जुने आणि अनावश्यक कायदे रद्द केले आहेत. गुंतवणूकदारांना जाचक ठरणारे अनेक कायदे काढून टाकण्यात आले आहेत. याद्वारे गुंतवणूकदारांना अनुकूल करण्यात आले आहे, असे प्रतिपादनही पंतप्रधान मोदी यांनी याप्रसंगी केले.
बेंगळूरमधील राजवाडा मैदानावर आयोजित तीन दिवसीय जागतिक भांडवल गुंतवणूकदार मेळाव्याचे व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्यांनी प्रगतीच्या दिशेने वाटचाल केल्यास देशाचा विकास शक्य आहे. या उद्देशाने जागतिक भांडवल गुंतवणूकदार मेळावा आयोजिने हा एक उत्तम प्रयत्न आहे. त्यामुळे देशाच्या विकासात भर पडणार आहे. कोरोना संकटावर समर्थपणे मात करून देश प्रगतीच्या दिशेने पुढे वाटचाल करीत आहे. देश आता डिजिटल क्रांतीच्या वाटेवर आहे. त्याला अनुसरून आपण काम केले पाहिजे, असा कानमंत्रही त्यांनी दिला.
कर्नाटकात होत असलेला गुंतवणूकदार मेळावा स्पर्धा आणि संघटीत व्यवस्थेचा एक भाग आहे. जगातील अनेक देशांमधील कंपन्या हजारो कोटींच्या भांडवल गुंतवणुकीसाठी करार करणार आहेत. त्यामुळे देशात मोठय़ा प्रमाणात थेट विदेशी गुंतवणुकीत भर पडणार आहे. आपल्या सरकारने गुंतवणूकदारांना लालफितीतून मुक्त केले आहे. तसेच उद्योजकांना रेड कार्पेट अंथरले आहे. संरक्षण, ड्रोन, अंतराळ संशोधन आणि जीयोस्पेशीअल मॅपिंगसारख्या खासगी गुंतवणुकीला बंद असणारी क्षेत्रे खुली करण्यात आली आहेत. या क्षेत्रांमध्ये खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात येत आहे, असेही मोदींनी सांगितले.
अदानी, जेएसडब्ल्यूकडून 1 लाख कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा
राज्यात पुढील 7 वर्षांत 1 लाख कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येणार आहे, अशी घोषणा अदानी ग्रुपचे सीईओ करण गौतम यांनी केली. अदानी ग्रुप वेअर हाऊस, डिजिटल, सिमेंटसह विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करेल, असेही त्यांनी सांगितले. जेएसडब्ल्यूचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी जेएसडब्ल्यू ग्रुपकडून आगामी काळात कर्नाटकात 1 लाख कोटींची गुंतवणूक करण्यात येईल, असे सांगितले. तर स्टैर्लेट पॉवरचे सीईओ प्रतीक अगरवाल यांनी ऊर्जा आणि ग्रीन एनर्जी क्षेत्रात राज्यात 50 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले आहे.
लॉकहिड मार्टीन कंपनी आपले कार्यक्षेत्र बेंगळूरमध्ये आणखी विस्तारण्यासाठी पुढे आली आहे. या कंपनीला सरकार सर्व प्रकारचे साहाय्य करणार आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले. बुधवारी लॉकहिड मार्टीन कंपनी सुरक्षा सेवा आणि एअरोस्पेस क्षेत्रात स्वतःचा असा ठसा उमटविला आहे. मागील 25 वर्षांपासून ही कंपनी बेंगळुरात आहे. आपले जाळे आणखी विस्तारण्यासाठी ही कंपनी सरसावली आहे. इलेक्ट्रिकल, कृत्रिम बुद्धीमत्ता, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल या क्षेत्रांमध्ये ही कंपनी योगदान देत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. करारांची गांभीर्याने दखल
इन्व्हेस्ट कर्नाटक 2022 या भांडवल गुंतवणूक मेळाव्यामध्ये स्वाक्षऱया करण्यात आलेल्या सर्व गुंतवणूक करारांची सरकार गांभीर्याने दखल घेतली आहे. हे प्रकल्प कार्यरुपात आणण्यासाठी सरकार सर्व प्रकारच्या संमती आणि सहकार्य देणार आहे. पुढील तीन महिन्यात गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी देण्याची कार्यवाही सरकार करेल.
– बसवराज बोम्माई, मुख्यमंत्री
‘ब्रॅण्ड बेंगळूर’विषयी मोदींकडून प्रशंसा
बॅण्ड बेंगळूरविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली. बेंगळूरने जगभरात नावलौकिक प्राप्त केला आहे. प्रतिभा आणि तंत्रज्ञान हे दोन्ही मुद्दे समोर आल्यास सर्वप्रथम बेंगळूरचे स्मरण होते, असे उद्गार त्यांनी काढले.