हेमंत सोरेन यांच्यासाठी अग्निपथ ठरणार निवडणूक
वृत्तसंस्था/ रांची
इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असे बोलले जाते. काहीसे असेच झारखंडमध्ये घडत आहे. कधी आदिवासींसाठी गुरु ठरलेले शिबू सोरेन यांनी वेगळय़ा राज्यासाठी आंदोलन सुरू केले तेव्हा भाजप सत्तेपासून खूप दूर होता. राज्याच्या स्थापनेच्या 22 वर्षांनी शिबू सोरेन यांचे पुत्र विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासमोर आता इकडे आड, तिकडे विहिर अशी स्थिती आहे. एकीकडे आदिवासींचे नेतृत्व तर दुसरीकडे आघाडी धर्म असा पेच त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
हेमंतन सोरेन यांनी झारखंडचे रहिवासी यशवंत सिन्हा यांना समर्थन द्यावे अशी त्यांच्या घटक पक्षांची मागणी आहे. तर सिन्हांना समर्थन दिल्यास आदिवासी उमेदवाराला विरोध केल्याचा ठपका भाजपकडून ठेवला जाणार आहे. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील सरकारकडे बहुमत असले तरीही ते काठावरचे आहे. अशा स्थितीत घटक पक्षांना दुखावणे सोरेन यांच्यासाठी कठिण ठरणार आहे.
सोरेन यांच्यासाठी अग्निपथ
द्रोपदी मूर्मू यांना विरोध केल्यास राज्यातील आदिवासी मतदारांदरम्यान पक्षाच्या विरोधात संदेश जाण्याची भीती सोरेन यांना सतावत आहे. राज्यातील विरोधी पक्ष भाजपचे नेते अर्जुन मुंडा आणि बाबूलाल मरांडी यासारखे आदिवासी नेते अशा स्थितीत आक्रमक भूमिका घेऊ शकतात. परंतु सोरेन यांनी आघाडीच्या विरोधात निर्णय घेतल्यास ते एक विश्वासू सहकारी नसल्याची धारणा तयार होणार आहे. अशा स्थितीत आघाडी सरकार चालविताना अधिकच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.