वृत्तसंस्था/ मल्लापूरम (केरळ)
येथे सुरू असलेल्या 75 व्या संतोष करंडक पुरूषांच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या उपांत्य सामन्यात पश्चिम बंगालने मणिपूरचा 3-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता या स्पर्धेत पश्चिम बंगाल आणि यजमान केरळ यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
या स्पर्धेच्या इतिहासात पश्चिम बंगालने आतापर्यंत 46 वेळा अंतिम फेरीत प्रवेश मिळविला असून त्यांनी विक्रमी 32 वेळा संतोष करंडकावर आपले नाव कोरले आहे. येत्या सोमवारी पश्चिम बंगाल आणि यजमान केरळ यांच्यात अंतिम लढतीत जोरदार चुरस अपेक्षित आहे.
शुक्रवारच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी पश्चिम बंगाल संघाचे प्रशिक्षक रंजन भट्टाचार्यजी यांनी आपल्या खेळाडूंना आक्रमक खेळ करण्याचा सल्ला दिला होता. पश्चिम बंगाल संघातील मेताईने मणिपूरच्या बचावफळीला हुलकावणी देत पहिला गोल 17 व्या मिनिटाला नोंदविला. त्यानंतर 30 व्या मिनिटाला पश्चिम बंगालच्या आघाडीफळीतील खेळाडूंनी मणिपूरच्या बचावफळीला हुलकावणी देत चेंडू मणिपूरच्या गोलपोस्टपर्यंत नेला.
दरम्यान मेताईने पश्चिम बंगालचा दुसरा गोल करून मध्यंतरापर्यंत आपल्या संघाला मणिपूरवर 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. सामन्यातील 74 व्या मिनिटाला पश्चिम बंगालचा तिसरा गोल दिलीप ओरावेनने नेंदविला. या सामन्यात पश्चिम बंगालच्या बचावफळीची कामगिरी अत्यंत भक्कम झाल्याने मणिपूरच्या अनेक चढाया वाया गेल्या. त्यांना शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. पश्चिम बंगाल संघाला 2018 साली या स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यात केरळकडून पराभव पत्करावा लागला होता. तसेच प्राथमिक गटातील लढतीत त्यांना केरळकडून हार पत्करावी लागली होती. आता सोमवारी होणाऱया अंतिम सामन्यात पश्चिम बंगालचा संघ मागील पराभवाची परतफेड करण्यासाठी सज्ज झाला आहे.