मलप्पूरम (केरळ)
येथे सुरू असलेल्या 75 व्या अखिल भारतीय राष्ट्रीय पुरूषांच्या संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेत रविवारी अ गटातील सामन्यात पश्चिम बंगालने राजस्थानचा 3-0 अशा गोलफरकाने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेतील अ गटातील अन्य एका सामन्यात पंजाबने मेघालयवर 1-0 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळविला.
पश्चिम बंगाल आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात खेळाच्या उत्तरार्धात मोहम्मद फर्दीन अली मौलाने पश्चिम बंगालतर्फे दोन गोल नोंदविले. सामन्याच्या पूर्वार्धात पश्चिम बंगालने गोल करण्याच्या अनेक संधी गमविल्याने त्यांना हा सामना मोठय़ा फरकाने जिंकता आला नाही. मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. मध्यंतरानंतर खेळाच्या दुसऱया सत्रात पश्चिम बंगालने पेनल्टीवर आपले खाते उघडले. दिलीप ओरानने हा गोल केला. 59 व्या आणि 81 व्या मिनिटाला मोहम्मद फर्दीनने पश्चिम बंगालतर्फे आणखी दोन गोल नोंदवून राजस्थानचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत मोहम्मद फर्दीनने आतापर्यंत चार गोल नोंदविले आहेत. पश्चिम बंगालचा संघ उपांत्य फेरीत ब गटातील उपविजेत्या संघाबरोबर लढत देईल.
या स्पर्धेतील अ गटातील अन्य एका सामन्यात अमरप्रित सिंगच्या एकमेव निर्णायक गोलाच्या जोरावर पंजाबने मेघालयचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला. या गटातील हा शेवटचा सामना होता. मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच राहिला होता. दरम्यान सामन्यातील 72 व्या मिनिटाला जशनदीप सिंगच्या पासवर अमरप्रित सिंगने पंजाबचा हा निर्णायक गोल नोंदविला.