वृत्तसंस्था/ डॉम्निका
मुसळधार पावसामुळे शनिवारी येथे विंडसर पार्क मैदानावरील यजमान विंडीज आणि बांगलादेश यांच्यातील पहिला टी-20 सामना वाया गेला. ही मालिका तीन सामन्यांची आहे.
पहिल्या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. येथे झालेल्या पावसामुळे हा सामना निर्धारित वेळेपेक्षा 100 मिनिटे उशिरा सुरू झाला. खेळपट्टी आणि मैदानाची पाहणी करून पंचांनी हा सामना 20 ऐवजी 16 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या डावाला प्रारंभ झाल्यानंतर आठवे षटक चालू असताना पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने पंचांनी खेळ थांबविला. त्यानंतर हा सामना प्रत्येकी 14 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेतला गेला. बांगलादेशने 13 षटकांत 8 बाद 105 धावा जमविल्या असताना पुन्हा पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी सामना रद्दची घोषणा केली.
बांगलादेशच्या डावामध्ये शकीब अल हसनने 15 चेंडूत दोन षटकार, दोन चौकारांसह 29, अनामुल हकने 10 चेंडूत तीन चौकारांसह 14, मुनीम शहरीयारने 2, लिटॉन दासने 2 चौकारांसह 9, कर्णधार महमुदुल्लाने 13 चेंडूत 8 धावा जमविल्या. नुरूल हसनने सर्वाधिक म्हणजे 16 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारांसह 25, मेहदी हसनने 1, नसूम अहमदने 1 चौकारांसह नाबाद 7 धावा जमविल्या.
बांगलादेशच्या डावात 4 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे शेफर्डने 21 धावांत 3, हेडन वॉल्शने 24 धावांत 2 तर अकिल हुसेन, मॅकॉय आणि ओडेन स्मिथ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. विंडसर पार्क स्टेडियमचे नुतनीकरण केल्यानंतर या मैदानावरचा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश ः 13 षटकात 8 बाद 105 (शहरियार 2, अनामूल हक 16, शकीब अल हसन 29, दास 9, मेहमुदुल्लाह 8, नुरूल हसन 25, मेहदी हसन 1, नसूम अहमद नाबाद 4, शेफर्ड 3-21, वॉल्श 2-24, अकिल हुसेन, मकॉय, स्मिथ प्रत्येकी एक बळी).