‘टी20’ मालिका जिंकण्यात यश, अल्झारी जोसेफचे 5 बळी
वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
वेस्ट इंडिजने मंगळवारी वाँडरर्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी विजय मिळवत टी-20 मालिका 2-1 ने जिंकली. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू रोमारियो शेफर्डने आपल्या नाबाद 44 धावांच्या झटपट खेळीद्वारे संघाची धावसंख्या 220 वर पोहोचविली. तर अल्झारी जोसेफने पाच गडी टिपून दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानातील दम काढून घेतला. त्यामुळे यजमानांच्या रीझा हेन्ड्रिक्सची अर्धशतकी खेळी फुकट गेली.
दक्षिण आफ्रिकेने दुस-या ‘टी20’मधील त्यांच्या धडाकेबाज कामगिरीची जवळजवळ पुनरावृत्ती केली होती. मात्र, अखेरीस ते काही धावांनी लक्ष्य गाठण्यात कमी पडले. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने हा ‘टी20’ सामना अंतिम सामना मानून संघाने कसा भर दिला ते सांगितले. आम्ही या लढतीला अंतिम फेरीच मानले. आम्हाला माहीत होते की लवकर बळी घेतल्यास ते दडपणाखाली येतील. किंग आणि मेयर्स यांनी संपूर्ण मालिकेत आम्हाला चांगली सुरुवात करून दिलेली आहे. आमची फलंदाजीतील ताकदही यावेळी मोठी होती. त्याशिवाय आमच्याकडे दर्जेदार गोलंदाजही आहेत. गोलंदाजांसाठी दक्षिण आफ्रिका ही चांगली जागा आहे. मला माहीत होते की, अल्झारीला येथील खेळपट्ट्या आवडतील. सहा चेंडूंत चार यॉर्कर कोण टाकू शकतील हे आम्हाला माहीत होते, असे पॉवेल म्हणाला.
दुसऱ्या ‘टी20’ मध्ये वेस्ट इंडिजचा संघ 258 धावा करूनही कमी पडला होता. पण त्यातून स्वत:ला सावरत त्यांनी या थरारक सामन्यात विजय मिळवला. ‘मागील सामन्यानंतर खेळाडू निराश झाले होते. पण शेफर्ड आणि अल्झारी यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती सुखावणारी होती. अल्झारीने आम्हाला बळीही मिळवून दिले. नवा आंतरराष्ट्रीय कर्णधार या नात्याने त्यांनी निर्भयपणे आणि नैसर्गिक पद्धतीने खेळावे असे मला वाटते. आम्हाला माहीत आहे की, 250 धावसंख्या नोंदवूनही पराभूत व्हावे लागणे असे क्वचितच घडते’, असे पॉवेलने सांगितले. अल्झारी जोसेफने आपल्या चार षटकांत क्विंटन डी कॉक, मिलरसह पाच बळी घेत वेस्ट इंडिजच्या बाजूने सामना झुकविला. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
संक्षिप्त धावफलक : वेस्ट इंडिज 8 बाद 220 (रोमारियो शेफर्ड नाबाद 44, निकोलस पूरण 41, नोर्ट्जे 36 धावांत 2-36, एनगिडी 2-45) दक्षिण आफ्रिका 6 बाद 213 (हेन्ड्रिक्स 83, मार्करम नाबाद 35, अल्झारी जोसेफ 5-40, जेसन होल्डर 1-42)