वृत्तसंस्था/ प्रॉव्हिडन्स (गयाना)
कर्णधार निकोलस पुरनच्या शानदार फटकेबाजीच्या जोरावर गुरुवारी येथे शेवटच्या टी-20 सामन्यात यजमान विंडीजने बांगलादेशचा 5 गडय़ांनी दणदणीत पराभव केला. यजमान विंडीजने ही मालिका 2-0 अशी एकतर्फी जिंकली. कर्णधार पुरनला मालिकावीर आणि सामनावीर असा दुहेरी पुरस्कार देण्यात आला.
या शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 20 षटकात 5 बाद 163 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजने 18.2 षटकात 5 बाद 169 धावा जमवित हा सामना जिंकला.
बांगलादेशच्या डावामध्ये सलामीच्या लिटॉन दासने 41 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 49, अनामूल हकने 1 चौकारासह 10, शकीब अल हसनने 1 चौकारासह 5, अफिफ हुसेनने 38 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 50, कर्णधार मेहमुदुल्लाने 20 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 22, एम. हुसेनने 2 चौकारांसह नाबाद 10 आणि नुरुल हसनने नाबाद 2 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावात 5 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे वॉल्शने 25 धावात 2 तर स्मिथ, शेफर्ड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावामध्ये सलामीच्या मेयर्सने 38 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांसह 55, किंगने 1 षटकारासह 6, बुक्सने 2 चौकारांसह 12, स्मिथने 2, कर्णधार पुरनने 39 चेंडूत 5 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 74, पॉवेलने 5 आणि अकिल हुसेनने नाबाद 3 धावा जमविल्या. विंडीजच्या डावामध्ये 11 षटकार आणि 9 चौकार नोंदवले गेले. बांगलादेशतर्फे नसुम अहमदने 2 तर मेहदी हसन, शकिब अल हसन आणि अफिफ हुसेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या मालिकेनंतर आता उभय संघात तीन सामन्यांची वन डे मालिका रविवारपासून खेळविली जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः बांगलादेश 20 षटकात 5 बाद 163 (अफिफ हुसेन 50, लिटॉन दास 49, मेहमुदुल्ला 22, एम. हुसेन नाबाद 10, अनामूल हक 10, वॉल्श 2-25, स्मिथ 1-34, शेफर्ड 1-19), विंडीज 18.2 षटकात 5 बाद 169 (किंग 7, मेयर्स 55, ब्रुक्स 12, स्मिथ 2, पुरन नाबाद 74, पॉवेल 5, अकिल हुसेन नाबाद 3, नसुम अहमद 2-44, मेहदी हसन 1-21, शकिब अल हसन 1-10, अफिफ हुसेन 1-10).