क्रीडा मंत्रालयाच्या आदेशानंतर निर्णय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाची (डब्ल्यूएफआय) रविवारी होणारी वार्षिक सर्वसाधारण बैठक रद्द करण्यात आली आहे. बैठक रद्द झाल्यानंतर त्यात सहभागी होण्यासाठी आलेले सर्व 54 सदस्य आता माघारी परतले आहेत. अयोध्येतील हेरिटेज हॉटेलमध्ये सकाळी 10 वाजता होणारी ही बैठक आता 4 आठवडय़ांनंतर होणार आहे. त्याचबरोबर गोंडा येथे सुरू असलेली राष्ट्रीय कुस्ती स्पर्धाही रद्द करण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालयाच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला असून ‘डब्ल्यूएफआय’चे सर्व उपक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे प्रकरण अधिकच चिघळल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने शनिवारी संध्याकाळी ‘डब्ल्यूएफआय’च्या सर्व नियोजित कार्यक्रमांना स्थगिती देण्याचे आदेश दिले होते. तसेच क्रीडा मंत्रालयाने फेडरेशनचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना 4 आठवडय़ांपर्यंत मीडियामध्ये कोणतेही वक्तव्य न करण्यास सांगितले आहे. अयोध्येत आज होणाऱया एजीएम बैठकीनंतर बृजभूषण शरण सिंह प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार होते, मात्र आता त्यांना पत्रकार परिषद घेता येणार नाही. याचदरम्यान फेडरेशनचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांना अनुशासनाच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे. खेळाडूंकडून लाच घेऊन करोडोंची संपत्ती जमवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी बृजभूषण शरण यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली असून चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना फेडरेशनच्या कार्यात सहभागी होण्यास मनाई केली आहे. दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) क्रीडा मंत्रालयाच्या सूचनेला उत्तर दिले. विरोध करणारे खेळाडू त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी डब्ल्यूएफआयची बदनामी करत आहेत. आंदोलनामागे त्यांचा वैयक्तिक अजेंडा असल्याचे फेडरेशनने म्हटले आहे.