Tarun Bharat

शिवसेनेची कोकणातील स्थिती काय सांगते?

शिवसेनेतील बंडाचा धक्का शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातही बसल्यानंतर शिवसेना वाचविण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत मैदानात उतरले आहेत. शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या आमदारांचे ते कौतुक करीत आहेत, तर बंडखोर आमदारांचा समाचार घेत आहेत. दुसरीकडे शिंदे सरकारमध्ये बंडखोर आमदारांना मंत्रिपद मिळाले, तर कुणासोबत राहायचे, असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनात आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शिवसेनेंतर्गत दंद्व सुरू असून मंत्रिमंडळ विस्तारानंतरच शिवसेनेची कोकणातील स्थिती काय असेल, हे चित्र स्पष्ट होणार आहे.

विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर त्याच दिवशी शिवसेनेत मोठे बंड होऊन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा एक गट शिवसेनेतून बाहेर पडला व सुरतला पोहोचला. सुरुवातीला ज्यावेळी पहिला गट बाहेर पडला, त्यावेळी कोकणातील सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हय़ातील एकही शिवसेना आमदार शिंदे गटासोबत नव्हते. परंतु, त्यानंतर सिंधुदुर्गातील सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपशी जुळवून घ्यायला पाहिजे, असे सांगत सुरतवरून गुवाहाटीला पोहोचलेल्या शिंदे गटात सामील झाले. अगदी ते शिंदे गटाचे प्रवक्तेही झाले. समर्थपणे शिंदे गटाची भूमिका ते मांडत आहेत व विरोधकांना प्रत्त्युत्तर देत आहेत.

केसरकर यांच्यानंतर रत्नागिरीचे आमदार उदय सामंतही शिंदे गटात सहभागी झाले. तत्पूर्वी खेडचे आमदार योगेश कदमही शिंदे गटात सहभागी झाले होते. त्यामुळे शिवसेनेच्या कोकणातील बालेकिल्ल्याला मोठा सुरुंग लागला आणि कोकणातही शिंदे व शिवसेना असे दोन गट पडायला सुरुवात झाली. सिंधुदुर्गातून कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक, तर रत्नागिरीतून राजापूरचे राजन साळवी व गुहागरचे भास्कर जाधव शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिले. त्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या तिन्ही आमदारांचे खास कौतूकही केले.

शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी व भाजपचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. आता नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. त्यात कोकणातील दीपक केसरकर व उदय सामंत यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, अशी अधिक शक्यता आहे. त्यात उदय सामंत रत्नागिरीचे पालकमंत्रीही होतील, तर सिंधुदुर्गात भाजपच्या कोटय़ातून भाजप आमदार नीतेश राणे मंत्री झाल्यास पालकमंत्री केसरकर की राणे होतील, हा प्रश्न आहे. केसरकर यांची कॅबिनेट मंत्री पदावर वर्णी लागेल, हे निश्चित मानले जात आहे.

सत्ता आल्यानंतर किंवा आपल्या भागाला मंत्रिपद मिळाल्यानंतर आपोआपच हळूहळू राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते मंत्र्यांच्या बाजूने झुकतात. कोकणात सध्या शिवसेनेच्या तीन आमदारांनी बंड केल्यानंतरही शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे दाखवत असले, तरी मंत्रिमंडळ विस्तारानंतर काय चित्र बदलेल, हे सांगता येत नाही.

शिवसेनेचे काही खासदारही फुटीच्या मार्गावर आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत हे मात्र शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. दोन्ही जिल्हय़ांचा दौरा करीत शिवसेना वाचविण्यासाठी ते पराकाष्ठा करीत आहेत. शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले आमदार वैभव नाईक, राजन साळवी, भास्कर जाधव यांचे ते कौतुक करीत आहेत. तर बंडखोर आमदार दीपक केसरकर, उदय सामंत यांचा समाचार घेत आहेत. शिवसेनेमुळे केसरकर व सामंत यांना मंत्रिपद मिळाले होते. मात्र आता विश्वासघात केला जात असल्याचा आरोप करीत दुरावलेल्या शिवसैनिकांना जवळ आणण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. रत्नागिरीमधून पुन्हा एकदा उदय बने यांना शिवसेनेचा उमेदवार म्हणून पुढे आणण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागा, असे सांगितले जात आहे. तर सिंधुदुर्गात पुढचे पालकमंत्री वैभव नाईक हेच असतील, असे सांगून शिवसैनिकांना शिवसेनेतच थांबवून धरण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. जुन्या शिवसैनिकांना सक्रीय करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी थेट मातोश्रीवर भेट घालून देत आहेत. त्याचबरोबर काही शिवसेना पदाधिकाऱयांचे खांदेपालटही सुरू आहे. एकूणच शिवसेनेची पुनर्बांधणी सुरू झाली आहे.

शिवसेनेतील रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील तीन आमदारांनी बंड केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला, असे चित्र पाहायला मिळाले नाही. भाजपने मात्र आनंदोत्सव साजरा करीत फटाकेही फोडले. बंडखोरांवर टीका करीत एकनिष्ठ शिवसैनिकांनी मोर्चे काढले. आमदार वैभव नाईक यांचे जोरदार स्वागतही झाले. सिंधुदुर्गात शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्ते एकनिष्ठ राहिल्याचे चित्र आहे. बंड केलेल्या दीपक केसरकर यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसत नाही. रत्नागिरी जिल्हय़ातही उदय सामंत यांना शिवसैनिकांकडून पाठिंबा मिळालेला दिसत नाही. मात्र केसरकर व सामंत या दोघांनाही मंत्रिपद मिळाले, तर मात्र कोकणातील शिवसेनेचे चित्र पालटू शकते का? हे पहावे लागेल.

आमदार केसरकर व सामंत या दोघांनाही मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अजूनही दोन्ही आमदारांनी शांततेची व संयमाची भूमिका घेतलेली दिसत आहे. आम्ही बंडखोर नाही, शिवसेनेतच आहोत, असे ते सांगत आहेत. मात्र मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांची भूमिका काय राहणार आहे, याचे औत्सुक्य आहे. मंत्री झाल्यावर जिल्हा दौरा करताना त्यांच्यासोबत शिवसैनिक जातील का, याचेही औत्सुक्य आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला असल्याने आणि मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने शिवसेनेसोबत राहायचं की शिंदे गटासोबत राहायचं? नेमकी काय भूमिका घ्यायची असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांना पडलेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शिवसेना अंतर्गत धुसफूस सुरू असून हे अंतर्गत दंद्व सर्वोच्च न्यायालयाचा निकाल व मंत्रिमंडळ विस्तारानंतर उघड होणार आहे.

शिवसेनेचे पुढे काय होणार आहे, असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकाला आहे. कारण शिवसेनेत झालेली फूट, आमचीच खरी शिवसेना असा शिंदे गटाने केलेला दावा आणि सध्याच्या व भविष्यातील न्यायालयीन लढाया याचा अंदाज येत नाही. त्यासाठी शिवसैनिक ‘वेट ऍण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत. शिवसेना संघटना पुनर्बांधणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर आहेत. त्यामुळे शिवसेनेचे मेळावे, सभा सुरू आहेत. हे सर्व होत असले, तरी पुढे काय? या प्रश्नाचे उत्तर पूर्णपणे सापडलेले
नाही.

संख्याबळाच्या जोरावर शिंदे गटाने आपले सरकार भाजपच्या सहभागाने बसवले आहे. तसेच आता यापुढे शिंदे गटाच्या सत्तेचे राजकारण शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर पुढे नेणार आहेत. पण पक्षीय राजकारण पुढे कसे सरकणार, शिवसेनेवर दोन्ही बाजूंकडून दावा होईल. सामान्य शिवसैनिक शिंदे गटात सहभागी होतील की शिवसेनेशीच एकनिष्ठ राहतील, हे प्रश्न आहेत. कोकणामध्ये राणे फॅक्टरसुद्धा महत्वाचा आहे. भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यामुळे केसरकर भाजपसोबत जाताना राणेंशी जुळवून घेतील का? असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे सध्या तरी नाहीत. मात्र शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, मंत्रिमंडळाचा विस्तार आणि आगामी काळातील नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणूकांनतरच या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत आणि शिवसेनेच्या अस्तित्वाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

संदीप गावडे

Related Stories

हस्तिदंती मनोऱयातील ‘कन्फ्युजन’

Patil_p

युद्धाची धग

Patil_p

विक्रम जोशींच्या खुनाची गोष्ट

Patil_p

सेन्सेक्स निर्देशांक 153 अंकांनी घसरला

Patil_p

मातोश्रीची कोंडी ?

Patil_p

तळहातावर घेऊन प्राण!

Patil_p