प्रियकराचा पेपर देण्यासाठी पोहोचली प्रेयसी
प्रेम आंधळं असतं असं म्हटलं जातं. प्रेमात पडलेली व्यक्ती स्वतःच्या जोडीदारासाठी काहीही करायला तयार असते. प्रेमासाठी आणि स्वतःच्या जोडीदारासाठी मोठमोठी युद्ध देखील झाली आहेत. प्रेमाच्या उत्कटतेच्या अनेक कथा तुम्ही वाचल्या आणि ऐकल्या असतील. परंतु काळ बदलला तसे प्रेम करण्याची आणि व्यक्त करण्याची पद्धतही बदलली आहे.
गुजरातमधील एका उच्चशिक्षित तरुणीने स्वतःच्या प्रियकरासाठी अत्यंत धोकादायक पाऊल उचलले आहे. यामुळे तिची शासकीय नोकरीच संकटात सापडली आहे. गुजरातच्या सूरत येथील वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठात शिकणारा एक विद्यार्थी परीक्षेच्या काळातच सहलीवर गेला होता. तर या विद्यार्थ्याचा पेपर देण्यासाठी त्याची प्रेयसी परीक्षा हॉलमध्ये गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
चांगले गुण मिळविण्यासाठी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पैसे देऊन डमी उमेदवार म्हणून परीक्षेला बसविण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा समोर आले आहेत. मात्र ही तरुणी मात्र शासकीय नोकरीत कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. स्वतःच्या प्रियकरासाठी पत्करलेला हा धोका तिच्या चांगलाच अंगलट येणार आहे.
बीकॉमच्या तिसऱया वर्षाची परीक्षा सुरू असताना या तरुणीने स्वतःच्या प्रियकरायच प्रवेशपत्रातील नाव आणि फोटो बदलला आणि ती परीक्षेसाठी गेली. मात्र अन्य एका विद्यार्थ्याने संबंधित क्रमांकावर यापूर्वी एक विद्यार्थी बसला होता असे पर्यवेक्षकाला सांगितल्याने तरुणीचा भांडाफोड झाला. परीक्षा समितीने तपास केल्यावर या तरुणीच्या शिक्षेबाबतची शिफारस विद्यापीठ व्यवस्थापनाकडे केली आहे.
नोकरी संकटात
या प्रकरणात संबंधित तरुणीची पदवी रद्द होऊ शकते आणि तिला नोकरीही गमवावी लागू शकते. तसेच तिच्या प्रियकराला पुढील 3 वर्षे परीक्षा देण्यापासून रोखले जाऊ शकते. तरुणीच्या प्रियकराने परीक्षा समितीसमोर हजर राहिल्यावर त्याने आपण उत्तराखंडला सहलीनिमित्त गेल्याचे कबूल केले. तर मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकाराबद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगितले आहे. संबंधित विद्यार्थी परीक्षेत सतत नापास होत होता, म्हणूनच त्याच्या जागी त्याच्या प्रेयसीने परीक्षा देण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.