Tarun Bharat

काय आहे यशस्वी उद्योजकाची गुरुकिल्ली?

अमेझॉन, फेसबुक, टाटा, ऍपल अशी बरीच नावे आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम आहेत. असे नाही की या कंपन्यांची बाजारात कोणतीही स्पर्धा नाही, पण तरीही आज सोशल मीडिया म्हटले की फेसबुकचे नाव घेतले जाते तर भारताचे यांत्रिक आणि तंत्रज्ञान क्षेत्र म्हटले तर टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचेच नाव डोळय़ापुढे येते. प्रत्येकाचे स्वप्न असते की अशाच दिग्गज लोकांसारखा मोठा व्यवसाय सुरू करायचा आणि पैशांसोबत खूप नावसुद्धा कमवायचे. हे स्वप्न कितीही छान वाटत असले तरी ते म्हणतात ना, प्रत्येक जण टाटा, अंबानी आणि सचिन तेंडुलकर होऊ शकत नाही.

आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करणे ही एक अतिशय धोकादायक गोष्ट आहे. तिथे आपल्या चुका पाठीशी घालणारा आपला व्यवस्थापक नसतो. आपण स्वतःचेच मालक असतो आणि आपल्या प्रत्येक निर्णयावर आपल्या कर्मचाऱयांचे आणि व्यवसायाचे कल्याण अवलंबून असते. त्याचबरोबर एखाद्या व्यवसायाच्या उत्कर्षासाठी त्यामध्ये काम करणाऱया कर्मचाऱयांचे खूप मोठे योगदान असते. एक माणूस सगळीकडे लक्ष देऊ शकत नाही म्हणूनच तो तज्ञ लोकांची मदत घेऊन व्यवसाय वाढवायला बघतो. पण अधिकाराच्या अहंकारामुळे त्याच लोकांची काळजी घ्यायला विसरतो. कित्येक व्यावसायिक कर्मचाऱयांकडून काम करून घेताना हे विसरतात की त्याच कर्मचाऱयांच्या कौशल्यामुळे व्यवसायात वृद्धी होत आहे. तरीही आजही बऱयाच ठिकाणी अशा कर्मचाऱयांना योग्य तो मान आणि मोबदला मिळत नाही.

कोणताही माणूस एका व्यवसायासाठी काम करण्यापूर्वी आपल्या कामाच्या बदल्यात आर्थिक आणि सामाजिक वृद्धीचीच अपेक्षा ठेवतो. आणि त्याच विचाराने तो दुसऱयाच्या व्यवसायाला हातभार लावतो. अशावेळेला या जगप्रसिद्ध व्यवसायांचे उदाहरण आपण डोळय़ासमोर ठेवले पाहिजे. त्यांनी असे काय केले ज्यामुळे ते आज एवढे यशस्वी आहेत? खरंतर खूप क्षुल्लक वाटणारे काही निर्णय आहेत जे मोठे व्यावसायिक घेत आले आहेत. आणि याच तर्काच्या जोरावर आज ते जगप्रसिद्ध होऊ शकले आहेत. एक इमानदार कर्मचारी म्हणून काही गोष्टी जर त्याला/तिला दिल्या, तर काम अजून जोराने सुरू ठेवता येईल.

1. चांगले व्यवस्थापन स्थापित करणे

कोणत्याही संस्थेची विश्वासार्हता त्याच्या सद्गुणांवर अवलंबून असते. अशावेळेला जेव्हा विविध क्षेत्रातली माणसे एका ठिकाणी काम करतात, तिकडे गोष्टी पद्धतशीरपणे आणि एकीने पार पाडणे अत्यंत आवश्यक असते. आपल्या आजूबाजूच्या माणसांची मने जपणे आणि त्यांना एकत्रित आणून काम करून घेणे ही खरंच एक कला आहे. त्यावर प्रभुत्व मिळविण्यासाठी, कामापलीकडे जाऊन माणूस समजून घ्यावा लागतो. म्हणूनच कोणत्याही व्यवसायात योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे.

2.ऑफिसमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे

जेव्हा कोणताही उद्योजक आपल्या व्यवसायासाठी काम करायला लोकांना नेमतो, तेव्हा ती माणसे दिवसातले 8-10 तास त्या व्यवसायासाठी देत असतात. ते पैसे कमवण्याच्या आणि व्यावसायिकदृष्टय़ा विकसित होण्याच्या आशेने एखाद्या संस्थेशी एकनि÷ राहणे निवडतात. आणि त्याचबरोबर संस्थेच्या कल्याणासाठी त्यांची प्रतिभा आणि कौशल्य समर्पित करतात. त्यामुळे, व्यवस्थापक म्हणून कामाच्या जागेमध्ये चांगल्या सुविधा, जसे की एक सुरक्षित ऑफिस, चांगले कॅण्टिन, वैद्यकीय मदत, अशा दैनंदिन जीवनात महत्त्वाच्या असलेल्या सर्व गोष्टी पुरवणे गरजेचे आहे.

3. कर्मचाऱयांच्या समस्यांची सोडवणूक

माणूस म्हटला की तिकडे चढउतार आलेच. आपल्या कामामध्ये कितीही तज्ञ असला तरी माणूस चुका करूनच शिकतो. अशावेळेला जेव्हा आपल्या आजू बाजूच्या कर्मचाऱयांबरोबर ते दिवसातले 8-10 तास घालवत असतात, तेव्हा काही मतभेद होणे साहजिक आहे. काही वेळेला ते सहज सोडवले जातात तर काही वेळेला त्या मतभेदांचा परिणाम कामावरदेखील होऊ शकतो. अशावेळेला उद्योजकाचे आपल्या कर्मचाऱयांच्या समस्यांकडे लक्ष असणे अतिशय आवश्यक आहे. समस्या समजून घेऊन त्यावर व्यवसायासाठी योग्य असलेला निर्णय घेतला गेला पाहिजे.

4. सकारात्मक वातावरण

उद्योजक बरेचदा हे विसरतात की ते स्वतःच्या व्यवसायाच्या उत्कर्षासाठी लोकांना त्यांचे कौशल्य वापरण्यासाठी मानधन देतात. त्यामुळे संस्थेमध्ये सकारात्मक वातावरण स्थापित करण्याची जबाबदारी संस्थेच्या मालकाचीच असते. उदाहरणार्थ, मागची दोन वर्ष पूर्ण जगाने कोरोनामुळे खूप कष्टात काढली. घर, स्वास्थ्य, कुटुंब आणि काम सांभाळताना प्रत्येक माणूस अडखळला होता. अशावेळेला बऱयाच संस्थांनी त्यांच्या कर्मचाऱयांची काळजी घेण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न केले. बोरोसिल, अमेझॉन, टीसीएस, पेटीमसारख्या संस्थांनी कर्मचाऱयांचे पगार कापले नाहीत तर त्यांना अतिरिक्त फायदे लागू करून दिले. आपत्कालीन परिस्थितीत जेव्हा अशा संस्था कर्मचाऱयांची साथ देतात, तेव्हा संस्थेबद्दलची त्यांची नि÷ा अधिक मजबूत होते.

5. निःपक्षपाती कायदे

आपण कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱया अत्याचारांबद्दल वाचतो. काही ठिकाणी छळवणूक आणि गैरव्यवहार करणाऱयाला शिक्षा होते पण बरेचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशावेळेला त्या महिलेने जर आवाज उठवला, तर तिला नोकरीवरून काढूनदेखील टाकतात. कारण संस्थांना आपली जनमानसातली प्रतिमा, त्या कर्मचाऱयाच्या समस्यांपेक्षा मोठी वाटत असते. बऱयाच स्त्रियांना गर्भावस्थेदरम्यान किंवा मासिक पाळीमध्ये खूप शारीरिक त्रास सहन करावा लागतो. अशावेळेला संस्थांनीही नैसर्गिक रचना समजून घेऊन त्यासाठी योग्य ती योजना आखली पाहिजे. संस्थेमध्ये योग्य कायदा असला तरच संस्थेचा पाया टिकून राहू शकतो.

 या सगळय़ा गोष्टींव्यतिरिक्त एक सर्वात मोठी गोष्ट माणूस विसरत चालला आहे. त्या समोरच्या माणसाचा दर्जा, त्याचे संस्थेतील स्थान किंवा शिक्षण बघून त्याच्याशी वर्तन न करता, माणूस म्हणून एकमेकांशी वागले पाहिजे. हा फरक जो माणूस समजू शकला, तोच पुढचा टाटा, अंबानी किंवा बिल गेट्स होऊ शकतो. कल्पनाशक्ती प्रत्येकाकडे असते,

पण त्या शक्तीचा योग्य वापर आणि त्याला प्रोत्साहित करणाऱया माणसांबरोबर जो उद्योजक काम करत नाही, तो इच्छा असूनसुद्धा यशस्वी होऊ शकत नाही. पण त्याचवेळेला एकमेकांच्या सहाय्याने आणि समाजाच्या उद्धारासाठी प्रामाणिकपणे जो मनुष्य आपली कल्पना अमलात आणू शकतो, तोच खरा यशस्वी उद्योजक ठरू शकतो.

-श्राव्या माधव कुलकर्णी

Related Stories

अटलजी एक व्रतस्थ याज्ञिक

Patil_p

भारतीय वन्यजीव सप्ताह

Amit Kulkarni

कोरोनाविरुद्धची रणनीतीः प्रश्नचिन्हेच प्रश्नचिन्हे

Patil_p

इच्छे सारिखा वीर आला

Patil_p

चीनमधील नव्या कोरोना लाटेचे आगमन

Patil_p

ड्रगमाफियांची पाळेमुळे उखडण्याची गरज

Patil_p
error: Content is protected !!