हिमाचल प्रदेशातील ही एक अजब प्रेमकहाणी आहे. या कहाणीतील ‘पती, पत्नी और वो’ हे तिन्ही दिव्यांग (मूकबधीर) आहेत. हिमाचल प्रदेशातील एका विवाहित महिलेचे प्रेम राजस्थानातील भरतपूर येथील एका युवकावर जडले. फेसबुकवरुन एकमेकांशी संवाद साधताना ते जुळले. महिलेने आपल्या पतीला सोडले आणि ती भरतपूरला येऊन या युवकासह राहू लागली. 4 वर्षे त्यांचा हा सहवास राहिला. इकडे पत्नी सोडून गेल्याने पतीने पोलिसात तक्रार दिली.
पत्नीच्या फेसबुक संपर्कांवरुन माग काढत हिमाचल प्रदेशातील पोलीस भरतूर येथे पोहचले. पोलीस स्थानकातही ही महिला आपल्या प्रेमी युवकासमवेतच आली. तथापि, पोलिसांनी नियमाप्रमाणे तिला अटक करुन हिमाचल प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन केले. हिमाचल प्रदेश पोलीसांनी तिला आपल्यासह परत आणले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेशातील भौरा गावातील अशोक कुमार यांचे लग्न या वृजबाला या महिलेसह 14 वर्षांपूर्वी झाले. या दोघांना दोन मुलेही आहेत. अशोक कुमार आणि त्यांची पत्नी वृजबाला या दोघांनाही ऐकायला किंवा बोलायला येत नाही. चार वर्षांपूर्वी ही महिला भरतपूरच्या गोविंद सैनी नामक मूकबधीर युवकाच्या प्रेमात पडली आणि हे सर्व प्रकरण घडले. आता पुढची कायदेशीर कारवाई जी व्हायची ती होईल. पण तीन मूकबधीरांमधील हे प्रेमप्रकरण पंचक्रोशी गाजत आहे. प्रेमाला ‘भाषा’ नसते हे अक्षरशः खरे ठरले आहे.