Tarun Bharat

कोणता उपाय घेऊ हाती?

वनखात्यासमोर प्रश्न : बिबटय़ा मोकाट, नागरिक-विद्यार्थी चिंतेत

प्रतिनिधी /बेळगाव

रेसकोर्स परिसरात दहशत माजविलेल्या बिबटय़ाला पकडण्यासाठी 22 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतरही वनखाते आणि पोलीस विभागाला पूर्णपणे अपयश आले आहे. वारंवार नजरेला पडलेला बिबटय़ा चकवा देत असल्याने आता बिबटय़ासाठी कोणता उपाय हाती घ्यावा, या विवंचनेत वनखाते आहे. दरम्यान, परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्नदेखील बिकट बनत चालला आहे. त्यामुळे बिबटय़ा कधी हाती लागणार? असा प्रश्न शहरवासियांना पडला आहे.

जाधवनगर परिसरात 5 ऑगस्ट रोजी एका गवंडय़ावर हल्ला करून बिबटय़ाने रेसकोर्स परिसरात आसरा घेतला आहे. दरम्यान, वनखात्याने शोधमोहीम हाती घेतली आहे. ट्रप कॅमेरे, पिंजरे, ड्रोन कॅमेरे, मुधोळ कुत्री आणि प्रशिक्षित हत्तींचादेखील वापर केला. मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे बिबटय़ा अद्याप मोकाटच फिरत असल्याचे दिसत आहे. सर्व यंत्रणेशी रेसकोर्सच्या मैदानात उतरलेल्या वनखात्याला अपयश आले आहे. रेसकोर्स परिसरात असलेल्या ट्रप कॅमेऱयामध्ये बिबटय़ाची छबी कैद होत आहे.

सोमवारी बिबटय़ा अगदी वनखात्याच्या हातातून निसटला. तर गुरुवारी मिलिटरी विनायक मंदिरजवळ पुन्हा निदर्शनास आला. त्यामुळे बिबटय़ा अद्याप रेसकोर्स परिसरातच असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, वनमंत्री उमेश कत्ती यांनी अधिकाऱयांना चोवीस तासांत बिबटय़ा जेरबंद करा, अशा सूचना केल्या होत्या. मात्र 22 दिवसांनंतर बिबटय़ा रेसकोर्स परिसरातच तळ ठोकून असल्याचे दिसत आहे.

पहिल्यांदा रेसकोर्स मैदानात टॅप कॅमेरे, पिंजरे व ड्रोन कॅमेऱयाच्या माध्यमातून बिबटय़ाचा शोध घेण्यात आला होता. मात्र काहीच निष्पन्न न झाल्यानंतर हुक्केरी येथून मुधोळ जातीची कुत्रीही मागविली होती. त्यापाठोपाठ शिमोगा येथील प्रशिक्षित हत्ती पथकालादेखील पाचारण करण्यात आले होते. मात्र बिबटय़ा हाती लागला नाही. त्यामुळे वनखात्याचे हे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले आहेत. त्यामुळे बिबटय़ाला पकडण्यासाठी आता कोणता उपाय हाती घ्यायचा? हा प्रश्न वनखात्यासमोर पडला आहे.

नियोजनाअभावी सोमवारी बिबटय़ा वनविभागाच्या हातातून निसटला. या प्रकारामुळे शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. शिवाय वनखात्याचा बेजबाबदारपणाही समोर आला. त्यानंतर तातडीने वनमंत्र्यांनी अधिकाऱयांना बोलावून बैठक घेतली. दरम्यान, तातडीने बिबटय़ाला जेरबंद करा, अशा सूचना करण्यात आल्या. मात्र बिबटय़ा अद्याप सुसाटच असल्याचे दिसत आहे. गुरुवारी दुपारी हिंडलगा मिलिटरी मंदिर शेजारी बिबटय़ासाठी जेसीबीच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू होती. दरम्यान जेसीबीच्या आवाजाने बिबटय़ाने पलायन केले. त्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली. मात्र बिबटय़ा सुसाट रेसकोर्सच्या परिसरात निघाला. त्यामुळे कर्मचाऱयांचे प्रयत्नही अपुरे ठरले.

कुत्रा, शेळी बांधून पिंजऱयाचा वापर करावा

रेसकोर्स परिसरात ठिकठिकाणी पिंजरे लावून त्यामध्ये शेळी आणि कुत्री बांधावीत. शेळी आणि कुत्र्याच्या आवाजाच्या दिशेने बिबटय़ा येईल आणि तो पिंजऱयात सापडेल. शिवाय पिंजऱयाच्या ठिकाणी ट्रप कॅमेऱयांची व्यवस्था करावी. त्यामुळे बिबटय़ाचे लोकेशन समजण्यास मदत होईल. शेवटचा पर्याय म्हणून वनखात्याने पिंजऱयांमध्ये कुत्री आणि शेळीच बांधावी, अशी मागणीदेखील वन्यप्राणी अभ्यासकांतून होत आहे.

गर्दी आणि इतर कारणांमुळे बिबटय़ा बिथरला

बिबटय़ासाठी शोधमोहीम सुरू आहे. मात्र नागरिकांची गर्दी आणि इतर कारणांमुळे बिबटय़ा बिथरला गेला आहे. रेसकोर्स परिसराच्या आजूबाजूला नागरिकांनी गोंगाट, गर्दी करू नये, शोधमोहिमेला सहकार्य करावे, रेसकोर्स परिसरात बिबटय़ाच्या उपजिविकेसाठी लहान प्राणी आणि पाणी देखील असल्याने त्याने आसरा घेतला आहे. 

मल्लिनाथ कुसनाळ (एसीएफ वनखाते)

बिबटय़ासाठी आता हनीट्रपचा वापर : बिबटय़ाला जाळय़ात पकडण्यासाठी मादी जातीच्या बिबटय़ाच्या मलमूत्राचा वापर

मागील 22 दिवसांपासून कॅमेरे, कुत्री आणि हत्तीच्या पथकालादेखील बिबटय़ाचा शोध लावता आला नाही. त्यामुळे आता बिबटय़ाच्या शोधासाठी हनीट्रपचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हनीट्रपवरून बिबटय़ा सापडणार का? हेच पहावे लागणार आहे.

भुतरामहट्टी येथील मादी जातीच्या बिबटय़ाच्या मलमूत्राचा यासाठी वापर केला जाणार आहे. मलमूत्र रेसकोर्स परिसरातील काही ठिकाणी शिंपडले जाणार आहे. या वासावरून बिबटय़ा जवळ येईल आणि जाळय़ात अडकला जाईल, अशी आशा आहे. त्यामुळे बिबटय़ाला जाळय़ात अडकविण्यासाठी वनखात्याने हनीट्रपचा वापर हाती घेतला आहे. मात्र, हा कितपत यशस्वी होतोय, हेच आता पहावे लागणार आहे.

5 ऑगस्टपासून रेसकोर्स परिसरात दबा धरून बसलेला बिबटय़ा अथक प्रयत्नांनंतरही हाती लागला नाही. वनखाते आणि पोलीस विभागाची सर्व यंत्रणा जुंपली असली तरी अद्याप यश आले नाही. ट्रप कॅमेरे, पिंजरे, ड्रोन कॅमेरे, मुधोळ कुत्री आणि प्रशिक्षित हत्तींच्या माध्यमातूनदेखील शोध घेण्यात आला. मात्र, हाती काहीच सापडले नाही.

बिबटय़ा सातत्याने नजरेस पडत आहे. शिवाय ट्रप कॅमेऱयात छबी कैद होत आहे. मात्र, प्रत्यक्षात हाताला लागला नाही. त्यामुळे आता वनखात्याने बिबटय़ाच्या शोधासाठी हनीट्रपचा वापर केला आहे. बिबटय़ाला मोहात पाडण्यासाठी मादी जातीच्या मलमूत्राचा वापर केला गेला आहे. त्यामुळे आता बिबटय़ाच्या पाऊलखुणा आणि इतर पुरावा किंवा बिबटय़ा सापडतो काय? हे पहावे लागणार आहे.

Related Stories

दहावी परीक्षेसाठी शिक्षण खाते सज्ज

Omkar B

‘ट्रक’ पलटी नंतर ‘टेम्पो’मुळे ट्रॅफिक जाम..!

Rohit Salunke

वनखात्याचा गणेशोत्सव रेसकोर्सवरच

Amit Kulkarni

जीएसएस महाविद्यालयाचे फुटबॉल स्पर्धेत यश

Amit Kulkarni

तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड

Amit Kulkarni

अफवेमुळे बँकेमध्ये प्रचंड गर्दी

Patil_p