Tarun Bharat

बेळगाव-राकसकोप रस्ता डांबरीकरण कधी?

वाहनधारकांची कसरत : बेनकनहळ्ळी- कल्लेहोळ क्रॉसनजीकच्या रस्त्याची दुरवस्था : बेळगुंदी नजीकच्या उर्वरित रस्त्याच्या दुरुस्तीकडेही दुर्लक्ष

वार्ताहर /किणये

बेळगाव-राकसकोप रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्डय़ांमधून मार्ग काढताना वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. बेळगुंदी गावानजीक रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण कधी करणार? असा सवाल वाहनधारक व नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे.

गेल्या सात-आठ वर्षांपासून बेळगाव ते राकसकोप रस्त्याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले होते. रस्त्याच्या डांबरीकरणासाठी बेळगुंदी, सोनोली, राकसकोप, यळेबैल, बोकनूर या भागातील नागरिकांनी अनेकवेळा निवेदने दिली. तसेच आंदोलनही छेडले होते. अखेर नागरिकांच्या मागणीचा विचार करून आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून राकसकोप ते बेळगुंदी, कल्लेहोळ फाटय़ापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, कल्लेहोळ फाटय़ापासून ते बेनकनहळ्ळीपर्यंतचा रस्ता पूर्णपणे खराब झाला असल्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

बेळगुंदी, बोकनूर, सोनोली, यळेबैल, राकसकोप, बिजगर्णी, बेळवट्टी, इनाम बडस, बोकमूर, कावळेवाडी आदी गावातील वाहनधारकांची या रस्त्यावरून रोज मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. बेळगुंदी रस्ता करण्यात आला आहे. पण कल्लेहोळ क्रॉसपासून बेळगावला ये-जा करणे खड्डय़ांमुळे वाहनधारकांना डोईजड होऊ लागले आहे.

रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे दुचाकी व इतर वाहने नादुरुस्त होत आहेत. याचा फटका वाहनधारकांना बसू लागला आहे. रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.

रस्त्यावरील खड्डय़ांमुळे मोठा त्रास

बेनकनहळ्ळी गावाजवळ मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्डय़ांमुळे गावातील नागरिक व वाहनधारक अक्षरशः वैतागून गेलेले आहेत. केंबाळी नाला ते सावगाव क्रॉसनजीकचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. गावातील ब्रम्हलिंग मंदिर हे जागृत देवस्थान असून या मंदिराकडे दर सोमवारी भक्तांची मोठी वर्दळ असते. खड्डय़ांमुळे मंदिराकडे येणाऱया भक्तांनाही त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींनी बेनकनहळ्ळीजवळील या रस्त्याची पाहणी करून याचे त्वरित डांबरीकरण करण्यात यावे, अशी आम्हा ग्रामस्थांची मागणी आहे.

– बाबाजी देसूरकर, बेनकनहळ्ळी

रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करा

बेळगुंदी गावातील बरेच तरुण बेळगावला विविध ठिकाणी कामाला येतात. बहुतांशी कामगार हे दुचाकीवरून प्रवास करतात. बेळगुंदीजवळचा रस्ता डांबरीकरणाचा आहे. ही जमेची बाजू आहे. मात्र, कल्लेहोळ क्रॉसपासून बेळगावला ये-जा करणे खड्डय़ांमुळे त्रासदायक वाटत आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी या रस्त्याची पाहणी करून उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे.

– विश्वनाथ चक्हाण, बेळगुंदी

Related Stories

बेळगुंदी ग्राम पंचायतीमध्ये 91 टक्के मतदान

Patil_p

दहावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

Amit Kulkarni

आम्हाला मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या

Amit Kulkarni

खानापूर महामार्गावरील निम्म्याहून अधिक हायमास्ट बंद

Amit Kulkarni

मण्णूरमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

Amit Kulkarni

महानगरपालिकेला 16 कोटी मंजूर

Amit Kulkarni