नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित : जलशुद्धीकरण यंत्रणा कुचकामी : लाखो रुपयांचा निधी वाया : लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष


आण्णाप्पा पाटील /बहाद्दरवाडी
पृथ्वीवरील जीवसृष्टी पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. म्हणूनच पाण्याला जीवन असे म्हणतात. पूर्वी मनुष्यप्राणी नदी, विहिरी, झरे, कूपनलिका यांचे पाणी पीत होते. कालांतराने मानवाची प्रतिकारशक्ती कमी होऊ लागल्याने सध्या मात्र माणसाला शुद्ध पाण्याचीच आवश्यकता भासत आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रशासनामार्फत अनेक गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रणा बसविली आहे. मात्र, बहुतांशी गावांतील यंत्रणा बंद आहेत. लाखो रुपयांचा निधी यासाठी खर्च करूनही ग्रामीण जनता शुद्ध पाण्यापासून वंचित राहिली आहे.
गेल्या दहा-बारा वर्षांपूर्वी तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. यातील दोन-चार अपवाद वगळता सर्रास गावांतील या यंत्रणा बंद आहेत. असे असताना आता ग्रामपंचायतींमार्फत केंद्र व राज्य सरकारकडून काही गावांमध्ये जलजीवन योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेच्या माध्यमातूनही कामकाजाचा शुभारंभ होणार, पाण्याच्या टाक्या उभारल्या जाणार, पुन्हा जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात येणार, सरकारकडून लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार, दोन-चार महिने शुद्ध पाणी मिळण्याची यंत्रणा चालू राहणार आणि पुन्हा परिस्थिती जैसे थे अशीच राहणार आहे, अशी चर्चा सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
एखाद्या गल्लीच्या मध्यभागी, चौकात जलशुद्धीकरण यंत्रणा बसविल्या आहेत. त्यामध्ये एक रुपयाचे नाणे टाकून दहा लिटर पाणी मिळत होते. सुरुवातीचे चार-पाच महिने शुद्ध पाणी मिळाले. त्यानंतर मात्र ही यंत्रणा धूळखात पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी मिळणार कधी? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
सध्या डेंग्यू, मलेरिया या रोगांबद्दल प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्यावतीने गावागावांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. पाणी उकळून प्या, शुद्ध पाणी प्या असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱयांकडून देण्यात येत आहे. मग ग्रामीण जनतेला शुद्ध पाणी देण्यासाठी योग्य उपाययोजना का राबवत येत नाहीत.
गटारीचे पाणी साचून दुर्गंधी
बऱयाच गावांमध्ये गटारींमध्ये सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. डासांची उत्पत्ती अधिक प्रमाणात झाली आहे. याकडे त्या-त्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींनी लक्ष देण्याची गरज आहे. रोगराई पसरल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी पंधरा दिवस-महिनाभर नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करतात. मात्र यामध्ये सातत्य राहत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने प्रत्येक गावामध्ये किमान महिन्यातून एकदा तरी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी व्हायला हवी. पाण्यामुळे आजारी होत असतील तर नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करणे आवश्यक आहे. जलशुद्धीकरण यंत्रांच्या भिंती व काचांवर विविध जाहिराती चिकटविण्यात आल्या आहेत. या यंत्रांमधून पाणी तर मिळत नाहीच, मात्र काही जणांच्या प्रसिद्धीसाठी जाहिराती लावण्याचे केंद्र ते बनू लागले आहे.
किणये गावच्या प्रवेशद्वारावर जलशुद्धीकरण यंत्रणा बसविली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ही यंत्रणा बंद आहे. ग्रामपंचायतीच्या जवळ असणारी यंत्रणाच बंद असेल तर इतर गावांतील यंत्रणांचे काय? असा सवालही नागरिक करीत आहेत.
किणये बस स्थानकाजवळ नेहमी गर्दी असते. बाजूला शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, विविध संस्था आहेत. ही यंत्रणा सुरू झाली तर अनेकांना शुद्ध पाणी मिळणार आहे. पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या बाजूला जलशुद्धीकरण यंत्रणा बंद आहे. या यंत्रणेच्या आजूबाजूला झाडेझुडपे वाढलेली आहेत. ही यंत्रणा अन्य ठिकाणी बसविण्यात यावी, अशी मागणी पिरनवाडी येथील छत्रपती शिवस्मारक सेवा समितीतर्फे पंचायतीकडे निवेदन देऊन केली आहे.
धोरणात्मक उपाययोजना आवश्यक
कूपनलिका व विहिरींच्या पाण्याचा आधार नागरिकांना घ्यावा लागत आहे. बहुतांशी गावात हेच पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे दूषित पाणी पुरवठा होत असल्याने रोगराईचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे प्रशासनामार्फत ग्रामीण जनतेला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
अशी यंत्रणा बसविण्याची गरजच काय?


बेळगुंदी-राकसकोप रोडच्या बाजूला बेळगुंदी येथे जलशुद्धीकरण यंत्र सध्या बंद अवस्थेत आहे. गेल्या पाच वर्षांपासून यामधून कधी शुद्ध पाणी आलेच नाही. शुद्ध पाणी मिळत नसेल तर प्रशासनाने अशी यंत्रणा बसविण्याची गरजच काय? याच्या बाजूलाच अंगणवाडी शाळाही आहे. या यंत्रणेकडे ग्रामपंचायतीचेही साफ दुर्लक्ष झाले आहे. ही यंत्रणा सुरू झाल्यास बेळगुंदीसह राकसकोप रस्त्यावरून ये-जा करणाऱया नागरिकांनाही शुद्ध पाणी मिळू शकेल.
अरुण मोटणकर – बेळगुंदी
अधिकाऱयांनी फिरुन पाहणी करावी


आमच्या गावात बसविण्यात आलेले जलशुद्धीकरण यंत्र सध्या कुचकामी ठरले आहे. गावात बाराही महिने सुरू असणारे रामलिंग तीर्थकुंड आहे. या कुंडातील पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात. जलशुद्धीकरण यंत्र सुरू केल्यास वयोवृद्ध लोकांना तसेच लहान बालकांना तरी याचा फायदा होऊ शकतो. संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी गावोगावी फिरून या यंत्रणा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
बसाप्पा गवळी- नावगे
याकडे लक्ष देणार कोण?


किणये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूलाही जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आले आहे. मात्र, या यंत्रणेच्या समोरील काचा अज्ञातांनी फोडल्या आहेत. या यंत्रामधून सध्या शुद्ध पाणी येतच नाही. ही यंत्रणा सुरू झाल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राकडे येणाऱया रुग्णांना तसेच बाजूलाच असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना व शिवनगरमधील नागरिकांना शुद्ध पाणी मिळू शकेल. मात्र याकडे लक्ष देणार कोण? अशी अवस्था निर्माण झाली आहे.
निलेश चौगुले- शिवनगर