सीएचबी प्राध्यापकांचा कॉलेजला प्रश्न : दिवाळीपुर्वी सीएचबी प्राध्यापकांना मानधन मिळणार का? : 20 टक्के कॉलेजचे सीएचबी प्राध्यापक मान्यतेपासून वंचित
प्रतिनिधी/कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत 133 महाविद्यालये अनुदानित आहेत. या महाविद्यालयांमध्ये 1068 एवढे सीएचबी प्राध्यापकांची संख्या आहे. त्यांना दिवाळीच्या मुहुर्तावर मानधन मिळणार का? असा प्रश्न सीएचबी प्राध्यापकांकडून नाव न सांगण्याच्या अटीवर विचारला जातोय. परंतू अद्याप 20 टक्के महाविद्यालयातील सीएचबी प्राध्यापकांचे प्रस्तावच विद्यापीठाकडे मान्यतेसाठी आलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे उच्च शिक्षण कोल्हापूर विभागीय सहसंचालक कार्यालयाकडे अद्याप प्रस्तावच आलेली नाहीत. परिणामी दिवाळीपुर्वी या प्राध्यापकांना मानधन मिळेल की काही, अशी शंका शिक्षण क्षेत्रातून उपस्थित केली जातेय.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सीएचबी प्राध्यापकांच्या मुलाखती तीन महिन्यापुर्वी झाल्या. विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालये 2 ऑगस्टला सुरू झाली. परंतू अद्याप सीएचबी प्राध्यापकांच्या मान्यतेकडे काही कॉलेजने दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विद्यापीठाकडे प्रस्ताव आले तेवढयांना गेल्या तीन महिन्यापासून मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतू अद्याप 20 टक्के कॉलेजमधील सीएचबी प्राध्यापकांचे प्रस्तावच मान्यतेसाठी (अॅप्रूव्हल) विद्यापीठाकडे आले नाहीत. विद्यापीठ प्रशासनाच्या मान्यतेनंतर उच्च शिक्षण कोल्हापूर विभागीय सहसंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव जाणार. त्यानंतरच अनुदानासाठी राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठवला जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत किती वेळ जाणार हे स्पष्ट झालेले नाही.
एकत्रित शासनाकडे अनुदानासाठी माहिती पाठवणार
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत 20 टक्के अनुदानित महाविद्यालयातील सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीला अद्याप मान्यता मिळालेली नाही. मान्यतेनंतर सर्व सीएचबी प्राध्यापकांची एकत्रित माहिती गोळा करून राज्यशासनाकडे मानधनासाठी प्रस्ताव पाठवला जाईल. शासनाकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर किती दिवसात त्याला मान्यता मिळणार माहित नाही. परंतू शासनाकडे निधी उपलब्ध असल्यास त्वरीत सीएचबी प्राध्यापकांना मानधन दिले जाईल. डॉ. हेमंत कटरे (सहसंचालक, उच्च शिक्षण कोल्हापूर विभागीय)
सरकारडे पाठवला जाणार 2 कोटी 50 लाख मानधनाचा प्रस्ताव
विद्यापीठ अंतर्गत 133 महाविद्यालयातील 1068 सीएचबी प्राध्यापकांचे मानधन 2 कोटी 50 लाख ऐवढे होतेय. यातून युजीवरील सीएचबी प्राध्यापकांना प्रत्येक तासाला 500 तर पीजीवरील प्रत्येक प्राध्यापकाला 725 रूपये मानधन मिळणार आहे.
आलेल्या प्रस्तावांना मान्यता
शिवाजी विद्यापीठाकडे सीएचबी प्राध्यापकांचे जे प्रस्ताव गेल्या तीन महिन्यात आले, त्या प्रस्तावांना मान्यता दिली आहे. परंतू अद्याप ज्या महाविद्यालयांचे प्रस्ताव प्राफ्त झाले त्यांना मान्यता दिलेली नाही. ज्यांचे बुधवारी प्रस्ताव आले त्यांनाही मान्यता दिली आहे. डॉ. व्ही. एन. शिंदे (प्रभारी कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ)