तालुका म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार
प्रतिनिधी/ बेळगाव
म. ए. समितीच्यावतीने सोमवार दि. 19 रोजी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने परवानगी दिली नाही तरी महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार तालुका म. ए. समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केला आहे. गुरुवारी मराठा मंदिर येथे बैठक झाली. त्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी हा निर्धार केला.
मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी बेळगावात सुवर्णसौधची उभारणी करण्यात आली. त्या ठिकाणी अधिवेशन घेतले जात आहे. त्यामुळे त्याला तोडीसतोड म्हणून म. ए. समितीतर्फेही महामेळाव्याचे आयोजन केले जाते. यावेळीही मोठ्या प्रमाणात हा महामेळावा यशस्वी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनीही हा मेळावा यशस्वी करून मराठी भाषिकांची ताकद दाखवायची आहे. तेंव्हा तालुक्यातील प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे सांगितले.
सोमवार दि. 19 रोजी सकाळी 11 वाजता व्हॅक्सिन डेपो येथील मैदानामध्ये हा मेळावा होणार आहे. त्यासाठी आता प्रत्येक गावामध्ये जनजागृतीही करावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले आहे. माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, मनोज पावशे, अॅड. सुधीर चव्हाण, आर. एम. चौगुले, कृष्णा हुंदरे, रामचंद्र मोदगेकर, प्रकाश अष्टेकर, भागोजी पाटील, पुंडलिक पावशे, मोनाप्पा संताजी यांनीही आपले विचार व्यक्त केले. बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.