हॉटेल ओनर्स असोसिएशन, प्रदूषण नियंत्रण मंडळ अन् मनपा आयुक्तांची बैठक : माध्यम प्रतिनिधींना मज्जाव
प्रतिनिधी / बेळगाव
हॉटेलमध्ये निर्माण होणाऱया कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी उपकरणे बसवून घ्या, अशी सूचना करण्यासाठी गुरुवारी महापालिका कार्यालयात बैठक बोलविण्यात आली. महापालिका आयुक्त, कचरा विल्हेवाट यंत्रोपकरणे पुरवठा करणाऱया कंपनीचे प्रतिनिधी आणि हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱयांमध्ये मनपाच्या सभागृहात बंद दरवाजाआड कोणती ‘डील’ झाली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हॉटेलमध्ये मोठय़ा प्रमाणात कचऱयाचे उत्पादन होत असते. त्यामुळे या कचऱयाची विल्हेवाट संबंधित हॉटेल व्यावसायिकांनीच लावावी, अशी सूचना करण्यात आली होती. मात्र याची दखल घेण्यात आली नसल्याने कचऱयाची विल्हेवाट लावण्याबाबत चर्चा करण्यासाठी भाजीमार्केट, प्रूटमार्केट आणि हॉटेल ओनर्स असोसिएशनची बैठक आयोजित करून यंत्रोपकरणाबद्दल माहिती देण्यात आली होती. तसेच कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी खासगी कंपनीने तयारी दर्शविली होती. पण कचऱयाची उचल करण्याचा दर जास्त असल्याने भाजीमार्केट, प्रूटमार्केट आणि हॉटेल व्यावसायिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला होता.
त्यामुळे हॉटेलचालकांनीच आपल्या आस्थापनामध्ये कचऱयाची विल्हेवाट लावावी, याकरिता विविध पद्धतीच्या यंत्रोपकरणाचा उपयोग करावा, अशी माहिती देण्यासाठी गुरुवारी महापालिका कार्यालयात बैठक आयोजित केली होती. बैठकीला हॉटेल ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी, यंत्रोपकरणे पुरवठा करणाऱया कंपनीचे प्रतिनिधी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व मनपा आयुक्त उपस्थित होते. मात्र बैठकीला वृत्तपत्र माध्यमांना महापालिका आयुक्तांनी मज्जाव केला. बैठक सुरू झाल्यानंतर बोलाविण्यात येईल, असे सांगून वृत्तपत्र माध्यमाच्या प्रतिनिधींना बाहेर जाण्याची सूचना केली. यामुळे हॉटेल ओनर्स असोसिएशन, यंत्र पुरवठा करणाऱया कंपनीचे प्रतिनिधी व आयुक्तांमध्ये कोणती ‘डील’ झाली? असा मुद्दा उपस्थित झाला. वास्तविक, शहरातील कचरा सर्वांचीच डोकेदुखी आहे. पण या संबंधित बैठकीतून माध्यम प्रतिनिधींना बाहेर काढण्याचे गौडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता महापालिका आयुक्तांनादेखील वृत्तपत्र माध्यमाचे वावडे झाल्याचे यावेळी निदर्शनास आले.