Tarun Bharat

कॅम्प परिसरातील बळींना जबाबदार कोण?

Advertisements

कॅम्प परिसरात रस्त्यावरील अडथळय़ांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर : रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले, अडचणी हटविण्याकडे दुर्लक्ष का?

प्रतिनिधी /बेळगाव

कॅम्प परिसरात झालेल्या अपघातामुळे रस्त्यावरील अडथळय़ांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खानापूर रोडवर असलेली कॅन्टोन्मेंट बोर्डची संरक्षक भिंत आणि ऑक्ट्राय नाक्मयाचा खोका हटविण्यात आला नाही. तसेच रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले आहे. सदर अडचणी हटविण्याकडे दुर्लक्ष का? असा मुद्दा उपस्थित होत असून होणाऱया अपघातांना आणि यामध्ये जाणाऱया बळींना जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कॅम्प परिसरात अनेक शिक्षण संस्था असून कॅम्प परिसराला एज्युकेशन हब म्हणून ओळखले जाते. खानापूर रोडच्या दुतर्फा विविध माध्यमांच्या शाळा, हायस्कूल आणि विद्यालये आहेत. त्यामुळे हा परिसर सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांच्या गर्दीने गजबजलेला असतो. तसेच जवळच फिशमार्केट असल्याने याठिकाणी येणाऱया ग्राहकांची गर्दीही सकाळच्या सत्रातच अधिक असते. त्याचप्रमाणे खानापूर रोड हा राज्यमार्ग असल्याने वाहतुकीची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. खानापूर, रामनगर, दांडेली, कारवार, पणजी, वास्को अशा परराज्यातील शहरांना जाणाऱया वाहनांसह शहराच्या पश्चिम भागातील वाहनधारकदेखील या रस्त्यानेच ये-जा करीत असतात. या रस्त्यावरील अवजड वाहनांची वर्दळ थांबविण्यासाठी बायपास किंवा रिंगरोडचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र या प्रस्तावाला आक्षेप घेऊन जमीन मालकांनी न्यायालयात धाव घेतल्याने रिंगरोड आणि बायपासचे काम रखडले आहे. त्यामुळे यावर पर्याय म्हणून खानापूर रोडचे रुंदीकरण दहा वर्षांपूर्वी करण्यात आले होते. मात्र गोगटे चौक ते संचयनी चौकापर्यंतचा रस्ता कॅन्टोन्मेंट हद्दीत येत असल्याने रस्ता रुंदीकरणास परवानगी देण्यात आली नाही. आपल्या मालमत्तांचे नुकसान होणार असल्याने रहिवाशांनी रुंदीकरणास विरोध दर्शविला. तसेच काही बडय़ा व्यावसायिकांनी आपले व्यवसाय शाबित ठेवण्यासाठी रुंदीकरणास आक्षेप घेतला. त्यामुळे संचयनी चौक ते गोगटे चौकपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण रखडले होते.

रुंदीकरण रखडले

सदर रस्त्याशेजारील जागा कॅन्टोन्मेंट बोर्डची आहे. तसेच त्यावर असलेल्या इमारती या सर्वसामान्य नागरिकांच्या आहेत. त्यामुळे जागा आणि मालमत्तांची नुकसानभरपाई दिल्यानंतरच रुंदीकरणास परवानगी दिली जाईल, अशी भूमिका कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि संरक्षण खात्याने घेतली. या रस्त्याचा वापर कॅन्टोन्मेंटसह महापालिका व्याप्तीमधील वाहनधारक करतात. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येणाऱया रस्त्याच्या रुंदीकरणासाठी नुकसानभरपाई देण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याने नकार दिला. त्यामुळे रुंदीकरण रखडले आहे. तरीदेखील सार्वजनिक बांधकाम खात्याने उपलब्ध जागेत 3 वर्षांपूर्वी रुंदीकरणाचे काम घेतल्याने गोगटे चौक ते ग्लोब थिएटरपर्यंतचा रस्ता मोठा झाला आहे. मात्र ग्लोब थिएटरपासून संचयनी सर्कलपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. त्यामुळे या परिसरात नेहमी अडचण निर्माण होत असते. या परिसरात विविध शाळा असल्याने विद्यार्थ्यांची गर्दी नेहमी असते. वाहतुकीच्या गर्दीत विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून जावे लागते. खानापूर रोड ओलांडताना ग्लोब थिएटरसमोरील चौकात दुचाकी आणि अवजड वाहनांच्या अपघातात शाळकरी मुलाचा जीव काही वर्षांपूर्वी गेला होता. या ठिकाणी असलेली कॅन्टोन्मेंट बोर्डची संरक्षक भिंत हटवून चौकाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी त्यावेळी केली होती. पण सदर भिंत हटविण्यास कॅन्टोन्मेंट बोर्डने नकार दिला होता. जागेची भरपाई दिल्यानंतरच संरक्षण भिंत मागे घेण्यात येईल, असे पत्र सार्वजनिक बांधकाम खात्याला दिले होते. या चौकात अनेकवेळा अपघात झाले असून विद्यार्थी व पालक भीतीच्या छायेखाली रस्ता ओलांडत असतात. तसेच या परिसरात ऑक्ट्रॉय नाक्मयाची जीर्ण झालेली चौकी असून चौकी हटविण्याची मागणीही केली होती. पण चौकी हटविण्यासाठीही कॅन्टोन्मेंट बोर्डने नुकसानभरपाईची मागणी केली होती. त्यामुळे ग्लोब थिएटर ते संचयनी सर्कलपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. पण हा रस्ता आता खूपच धोकादायक बनला असून वाहनांची वर्दळ शाळकरी मुलांसह परिसरात राहणाऱया रहिवाशांना मृत्यूचा सापळा बनत आहे.

जिल्हा प्रशासन-कॅन्टोन्मेंटने प्रयत्न करण्याची मागणी

फिशमार्केट परिसरात खानापूर रोडवर पादचारी आणि विद्यार्थ्यांसाठी फूटब्रिज किंवा भुयारी रस्ता बनविण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने केला होता. तसेच याकरिता 100 कोटी अनुदानातून निधी मंजूर करून निविदा मागविल्या होत्या. मात्र या ठिकाणी भुयारी रस्ता निर्माण करण्यात आल्यास रात्री-अपरात्री अवैध प्रकार घडण्याची शक्मयता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे भुयारी मार्ग किंवा फूटब्रिज उभारण्यास काही शैक्षणिक संस्थांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे हा प्रस्ताव मार्गी लागला नाही. मात्र त्यानंतरही जीव मुठीत धरून रस्ता ओलांडणाऱया विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने कोणत्याच उपाययोजना राबविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या परिसरात होणाऱया अपघातांना आळा घालण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना राबविणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यादृष्टीने जिल्हा प्रशासन आणि कॅन्टोन्मेंट बोर्डने प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

Related Stories

कंग्राळी खुर्द-बेळगाव रस्ताकाम अर्धवट स्थितीत

Patil_p

1986 च्या हुतात्म्यांना उद्या अभिवादन

Patil_p

तंत्रज्ञानाला अवगत करून स्वावलंबी पिढी घडवा

Amit Kulkarni

यंदाचे पहिले ‘असनी’ वादळ बांगलादेश-म्यानमारला धडकणार

Omkar B

‘त्या’ खुनाचे गूढ अधिक गडद

Amit Kulkarni

प्रशासनाला आणखी किती बळी हवेत?

Amit Kulkarni
error: Content is protected !!