ओबीसी ‘ब’ प्रमाणपत्राकरिता तहसीलदार कार्यालयात अद्याप कोणीही अर्ज केला नसल्याची माहिती उपलब्ध
बेळगाव : महापौर-उपमहापौर निवडीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र उपमहापौर पद ओबीसी ‘ब’ महिलेकरिता राखीव असल्याने प्रमाणपत्राकरिता तहसीलदार कार्यालयात अद्याप कोणीही अर्ज केला नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे उपमहापौर पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरणार? याबाबत शहरात चर्चा सुरू आहे. तर या पदाची माळ मराठी गटाच्या गळ्यात पडणार का? याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. महापौर-उपमहापौर निवडणूक सोमवार दि. 6 रोजी होणार असून निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाने जोरदार तयारी चालविली आहे. तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेवरील प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार असून लोकनियुक्त सभागृहाची स्थापना होणार आहे. महापालिका निवडणूक होऊन सव्वा वर्ष झाले, पण महापौर-उपमहापौर निवडणूक झाली नसल्याने सभागृह अस्तित्वात आले नव्हते. त्यामुळे नगरसेवकांना अधिकार मिळाले नाहीत. पण आता नगरसेवकांना अधिकार प्राप्त होणार आहेत. महापौरपद सामान्य महिलेसाठी राखीव असून या पदाकरिता तीन नगरसेविका इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपच्या गटात याबाबत मोर्चेबांधणी सुरू आहे. तर उपमहापौर पद ओबीसी ‘ब’ महिलेकरिता राखीव आहे. त्यामुळे ओबीसी ‘ब’ प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक आहे. महापालिका निवडणुकीवेळी एकच वॉर्ड ओबीसी ‘ब’ महिलेकरिता राखीव होता. त्यामुळे या वॉर्डमधून म. ए. समितीच्या वैशाली भातकांडे निवडून आल्या आहेत. त्यामुळे उपमहापौर पदाच्या शर्यतीत त्यांना भाग घेता येणे शक्मय आहे.
सामान्य जागेवर निवडून आलेल्या नगरसेविकांना उपमहापौर निवडणुकीत भाग घेण्यासाठी ओबीसी ‘ब’ प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक आहे. मात्र ज्यांनी आयकर रिटर्न फाईल केली आहे, त्यांना ओबीसी ‘ब’ प्रमाणपत्र घेता येत नाही. त्यामुळे आयकर खात्याकडून ना हरकत दाखला घेतल्यानंतरच ओबीसी ‘ब’ प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन प्रादेशिक आयुक्तांना देण्यात आले होते. याची दखल घेऊन ओबीसी ‘ब’ प्रमाणपत्राकरिता अर्ज करणाऱ्याची नोंद ठेवण्यासाठी तहसीलदार कार्यालयात वेगळे रजिस्टर बनविण्यात आले आहे. त्यामुळे आयकर रिटर्न फाईल करणाऱ्यांची गोची झाली आहे. उपमहापौर पदासाठी भाजपमधील तीन महिला नगरसेविकांची नावे चर्चेत होती. पण यापैकी एका नगरसेविकेचे आयकर रिटर्न फाईल केले असल्याने माघार घेतले असल्याचे समजते. तर दोन नगरसेविकांनी उपमहापौर निवडणूक लढविण्याची तयारी चालविल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामध्ये अस्मिता भैरगौडा पाटील यांचा समावेश आहे. पण ओबीसी ‘ब’ प्रमाणपत्राकरिता शुक्रवारपर्यंत एकही अर्ज तहसीलदार कार्यालयात करण्यात आला नव्हता. यापूर्वी प्रमाणपत्र घेतले असल्यास निवडणूक लढविता येवू शकते. त्यामुळे उपमहापौरपदाच्या शर्यतीमध्ये कोण उतरणार? याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.