प्रवक्त्याकडून भाजपला घरचा अहेर, कला अकादमी नूतनीकरण प्रकरण
प्रतिनिधी/ पणजी
एका बाजूने पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातून भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी झटत आहेत, तर दुसऱया बाजूने त्याच पक्षाचे गोव्यातील सरकार मात्र भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचे कला अकादमी नूतनीकरण प्रकरणावरून सिद्ध होत आहे, अशी जोरदार टीका करत भाजप प्रवक्ते सावियो रॉड्रिग्स यांनी सरकारला घरचा अहेर दिला आहे.
सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये रॉड्रिग्स यांनी ही टीका केली आहे. निविदा प्रक्रिया न करताच कला अकादमीच्या नूतनीकरणासाठी तब्बल 50 कोटी रुपयांचे कंत्राट एका कंपनीला देण्यामागे काय कारण होते याचे स्पष्टीकरण मंत्री गोविंद गावडे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जनतेला द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
देशातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी काम करत आहेत. मात्र, गोव्यातील एका मंत्र्याने कोणतीही निविदा प्रक्रिया न करताच कला अकादमीच्या नूतनीकरणासाठी 50 कोटी रुपयांचे कंत्राट एका कंपनीला दिले आहे. त्यासंबंधी या मंत्र्याला मीडियाने प्रश्न विचारला असता, ताज महाल बांधण्यासाठी शहाजहानने निविदा जारी केली होती का? असा प्रतिसवाल त्यांनी केला. तसेच विना निविदा कंत्राट देण्याचा तो निर्णय सरकारचा होता, असेही त्यांनी मीडियाला सांगितले.
त्यावर बोलताना रॉड्रिग्स यांनी, शहाजहानच्या काळात हुकूमशाही पद्धतीने राज्य चालविले जात होते. गोव्यातही अशाच हुकुमशाही पद्धतीने राज्य चालविण्यात येते का? असा सवाल उपस्थित केला. आज आम्ही लोकशाही देशात राहत आहोत याचा सरकारला विसर पडला आहे का? असेही ते म्हणाले.
दरम्यान, कला अकादमी नूतनीकरण प्रश्नी आरोपांवर दक्षता खात्याने यापूर्वीच गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यासंदर्भात आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समितीही स्थापन करण्यास सरकारला सांगितले आहे, अशी माहिती रॉड्रिग्स यांनी दिली.