‘आप’चा सवाल : चाळीस कोटी दिल्याचा गिरीश चोडणकरांचा दावा केवळ दिखाऊपणा
प्रतिनिधी /पणजी
राज्यात नुकतेच झालेले भाजप-काँग्रेसचे राजकीय नाटय़, हा काँग्रेस भाजपची बी-टीम असल्याचा आणखी एक पुरावा असल्याचा दावा आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष ऍड. सुरेल तिळवे यांनी मंगळवारी केला.
गोवा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काँग्रेसच्या आमदारांना भाजपमध्ये येण्यासाठी 40 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा केला होता. असे असताना काँग्रेस पक्ष भाजपावर कारवाई करण्याऐवजी मूग गिळून गप्प का आहेत? असा सवाल तिळवे यांनी उपस्थित केला.
पक्षांतर हे काँग्रेसच्या डीएनएतच आहे. काँग्रेसचे आणि भाजपाचे संबंध नवरा-बायको प्रमाणे असल्याचे आपचे संयोजक अरविंद केजरीवाल नेहमी सांगत असतात. सध्या जरी पक्षांतराचे नाटक थांबले असले तरी येत्या काही दिवसांत हे राजकीय नाटक पुन्हा सुरू होणार. सध्या स्थानिक नेते आणि राष्ट्रीय नेत्यांमध्ये वाटाघाटी संबंधित चर्चा होत असल्यामुळे पक्षांतरास विलंब झाल्याचा टोला आपचे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी लगावला.
विधानसभेचे अधिवेशन सुरू होऊन दोन दिवस झाले तरीही विरोधी पक्षनेता निवडण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. गोव्याच्या राजकारणाच्या इतिहासातील हा सर्वात लाजिरवाणा प्रसंग असल्याची टीका नाईक यांनी केली.
विधानसभा अधिवेशन ही सर्वसामान्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारवर एक होऊन टीका करण्यासाठी उत्तम संधी होती. मात्र, सर्वात मोठा विरोधी पक्ष आपल्याच अजेंडय़ात व्यस्त असल्यामुळे ही संधी गमावल्याचे नाईक म्हणाले.
मडगावचे आमदार आणि काँग्रेसचे ज्ये÷ नेते दिगंबर कामत यांनी पुढे येऊन त्यांच्याच पक्षाने आरोप केलेल्या षड्य़ंत्राच्या खेळात ते सामील होते की नाही, हे स्पष्ट करावे, अशी मागणी आपचे उपाध्यक्ष संदेश तेलेकर यांनी केली.