Tarun Bharat

‘झुआरी ऍग्रो’ जमिनीचा ‘झोन’ का बदलला?

आमदार विजय सरदेसाई यांचा सवाल : नगरनियोजनमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार,जमिनीचा झोन पूर्ववत का करत नाही? व्यवहारात कुणाला मिळाली इक्विटी?भाऊसाहेबांची दृष्टी पुसली जात आहे?

प्रतिनिधी /मडगाव

झुआरी ऍग्रोची संपूर्ण विक्री हा गोव्याला ‘फास्ट ट्रक सेल’वर ठेवण्याचा भाग आहे का? असा प्रश्न गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे. निलंबित वास्को ओडीपीमधील ‘झुआरी’च्या झोन बदलाची चौकशी व्हावी आणि सदर जमिनीचा झोन पूर्ववत करावा, अशी मागणी त्यांनी नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे यांच्याकडे केली आहे.

1 जून रोजी झुआरी ऍग्रो केमिकल्सने 2135 कोटी रुपयांना खत प्रकल्प आणि संबंधित व्यवसायांची पारादीप फॉस्फेट्स लिमिटेडला विक्री पूर्ण झाली असल्याचे जाहीर केले. 19 ऑक्टोबर, 2019 रोजी तत्कालीन उद्योगमंत्री विश्वजित राणे यांनी झुआरी ऍग्रोचे कामकाज बंद करण्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, सरकारने अध्यादेश काढून कंपनीला भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कार्यकाळात औद्योगिक उद्देशासाठी दिलेली 1000 एकर जमीन परत घ्यावी, याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले आहे.

झुआरीचा झोन का बदलला?

सध्या विश्वजित राणे हे टीसीपीचे मंत्री आहेत आणि सरकारने रोखून ठेवलेल्या ओडीपीमध्ये झालेल्या चुका सुधारण्यासाठी ते सक्रिय असल्याचे मीडियातून दिसून येते. मला वाटते की, विश्वजित राणे यांनी जुन्या स्मृती जाग्या कराव्यात आणि त्याच उत्साहाने वास्को ओडीपीमध्ये, औद्योगिक कारणासाठी भेट दिलेल्या झुआरी ऍग्रोच्या जमिनीचा झोन वसाहत/निवासी कारणांसाठी बदलला आहे की नाही हे तपासून पाहावे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

व्यवहारात कुणाला मिळाली इक्विटी?

 तसे असल्यास, या संपूर्ण व्यवहारातून गोव्याला, विशेषतः जमिनीच्या हस्तांतरणातून काय फायदा होतो की, झुआरी ऍग्रोची संपूर्ण विक्री हा गोव्याच्या वेगवान विक्रीचा भाग आहे? यातून एखाद्याला ‘इक्विटी’ मिळाली आहे काय किंवा कुणी काही फायदा मिळवला आहे काय ? असे सवाल त्यांनी केले आहेत.

 भाऊसाहेबांची दृष्टी पुसली जात आहे काय?

 गोव्याची सर्वांगीण भरभराट व्हावी यासाठी गोवेकरांनी (कोमुनिदाद गावकार) 1968 मध्ये आपल्या जमिनी उद्योगांसाठी अर्पण केल्या होत्या. गोवा सरकारने आज किमान गोव्याची काळजी आणि राज्याप्रती कर्तव्य तरी दाखवायला हवे. प्रश्न असा आहे की, इक्विटी व्यवहारांद्वारे सार्वजनिक हिताचा उपक्रम खासगी हिताच्या उपक्रमात बदलला आहे का आणि भाऊसाहेब बांदोडकरांची औद्योगिक गोव्याची दृष्टी पुसली जात आहे का, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

Related Stories

पणजीचे फेस्त साधेपणाने

Patil_p

काँग्रेस, टीएमसीच्या ’त्या’ उमेदवारांना अपात्र ठरवा

Amit Kulkarni

काणकोणचा पाण्याचा प्रश्न 19 डिसेंबरपर्यंत सोडवा

Patil_p

व्हायब्रंट गोवावर दोन कोटींचा चुराडा

Amit Kulkarni

मिकी पाशेको यांचा राष्ट्रवादीला रामराम

Amit Kulkarni

बार्देशातील पाच गावे ओडिपीतून वगळणार

Amit Kulkarni