Tarun Bharat

उशिरा का होईना मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतला…

मसाज पार्लर किंवा डान्स बार ही गोव्याची संस्कृती नव्हती पण या गोष्टी गोव्यात फोफावल्या होत्या. कळंगूट येथील एका मसाज पार्लरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील युवकांना बेदम मारहाण करण्याची घटना हल्लीच घडली होती. या घटनेमुळे सर्वजण खडबडून जागे झाले. असे प्रकार किती दिवस सहन करायचे, हाच विचार करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी कळंगूट समुद्रकिनाऱयाला भेट दिली आणि सोमवारपासून सर्व बेकायदा मसाज पार्लर व डान्स बार बंद करण्याचा आदेश दिला. तसे पाहता हा आदेश यापूर्वीच निघायला पाहिजे होता पण उशिरा का होईना, मुख्यमंत्र्यांनी मसाज पार्लर व डान्स बार बंद करण्याचा योग्य निर्णय घेतला आहे, असेच म्हणावे लागेल.

गोव्याच्या किनारपट्टी भागात परराज्यातून आलेल्या व्यक्तींकडून हे मसाज पार्लर व डान्स बार चालविले जातात. मुळात मसाज पार्लर किंवा डान्स बारला गोव्यात परवाना मिळू शकत नाही. म्हणून अनेकांनी बेकायदेशीररित्या हा व्यवसाय सुरू केला होता. या बेकायेदशीर व्यवसायातून प्रचंड कमाई होत असल्याने साहजिकच राजकीय व्यक्तींपासून पोलीस अधिकाऱयांचा वरदहस्त होता. स्थानिक लोकांनी कित्येकदा आवाज उठविला पण हा आवाज कुणाच्याच कानावर पडला नाही. जर हा आवाज कानावर पडला असता तर या बेकायदेशीर मसाज पार्लर व डान्स बारवर यापूर्वीच कारवाई झाली असती.

केवळ एका कळंगूटमध्येच नव्हे तर गोव्याच्या संपूर्ण किनारपट्टी भागात मसाज पार्लर चालतात. त्याचबरोबर पणजी, मडगाव, वास्को या शहरांमध्ये देखील मसाज पार्लर सुरू आहेत व त्याची कल्पना पोलिसांनाही बऱयापैकी आहे मात्र पोलिसांनी कधीच स्वतःहून कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतलेला आढळत नाही कारण पोलिसांना दरमहिना हप्ता प्राप्त होतो. जर कारवाई केली तर हप्ता बंद होणारच त्याचबरोबर या बेकायदेशीर व्यवसायाचे हितसंबंध राजकीय व्यक्तींशी गुंतल्याने त्यांच्याकडून देखील दबाव येण्याची भीती पोलिसांना असायची.

महाराष्ट्रातील युवकांना कळंगूटमध्ये एका मसाज पार्लरमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली. या युवकांनी गोव्यात तक्रार नोंद न करता, महाराष्ट्रात जाऊन तेथे पोलीस तक्रार नोंद करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. सोशल मीडियावरून गोव्याची प्रचंड बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. गोव्यात येणाऱया पर्यटकांना कशा प्रकारची वागणूक मिळते, गोव्यात कशाप्रकारे लुबाडणूक होते, गोवा आता पूर्वीचा राहिलेला नाही. पर्यटनासाठी गोव्यात जाऊन पैसे वाया घालवू नका, अशा प्रकारच्या प्रतिक्रीया या व्हिडीओवर व्यक्त झाल्या होत्या.

काही टीव्ही चॅनलवरून हा व्हिडीओ प्रसारित झाला मात्र टीव्ही चॅनलच्या एकाही पत्रकाराने या बातमीच्या खोलात जाऊन चौकशी केली नाही. जर खोलात जाऊन चौकशी केली असती तर युवकांना मारहाण करण्यात गुंतलेल्या व्यक्ती कुठल्या व गोव्याशी त्यांचा काय संबंध, हे उघड झाले असते. त्याचबरोबर मसाज पार्लरमधील मुली कुठल्या, हे देखील उघड झाले असते. मुळात मसाज पार्लरमध्ये एकही गोवेकर संबंधित नव्हता. गोव्याबाहेरून आलेल्या व्यक्तीच त्यात गुंतल्या होत्या मात्र बदनामी झाली ती गोव्याचीच.

व्हायरल झालेले व्हिडीओ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यापर्यंत पोहोचले होते. त्यांनी त्याची गंभीर दखल घेत, प्रत्यक्ष कळंगूट समुद्रकिनाऱयाला भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी स्वतःची कार न वापरता मोटारसायकल पायलट सोबत जाणे पसंत केले. मोटारसायकल पायलट सोबत गेल्याने वाटेत लोकांशी चर्चा करतानाच इतर सर्व माहिती जाणून घेणे सोपे झाले. या अचानक दिलेल्या भेटीच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांना बरीच माहिती मिळाली व त्यांनी गोव्यात बेकायेदशीर मसाज पार्लर व डान्स बार बंद करण्याचा आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांना दिला. जर या आदेशाचे पालन स्थानिक पोलीस निरीक्षकांनी नाही केले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

ज्यांच्याकडे ‘स्पा’ परवाना आणि ब्युटी पार्लरचा परवाना आहे, ज्यांची आरोग्य, पोलीस आणि पर्यटन विभागाकडे नोंदणी आहे, त्यांनाच चालविण्याची परवानगी असेल. आयुर्वेदिक पंचकर्म केंदे, मसाज पार्लरमध्ये आयुर्वेदिक चिकित्सक असणे बंधनकारक असेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात येणाऱया पर्यटकांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त सूचना दिल्या आहेत. आम्ही सतत देखरेख ठेवणार आहोत आणि अतिरिक्त कोस्टल तसेच ट्रफिक पोलीस फोर्स असेल. वेश्या व्यवसाय असो, दलाल असो, फेरीवाले असो, अशा कृत्यांवर कडक कारवाई केली जाईल आणि त्यांना येथे परवानगी दिली जाणार नाही. अशा कामांना प्रोत्साहन देणाऱयांना अटक केली जाईल. आम्ही पर्यटन कायद्यात आणि गृह विभागाच्या पोलिसिंग कायद्यातही सुधारणा आणत आहोत. आम्ही एक ऍप घेऊन येत आहोत, जिथे पर्यटक त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात आणि पोलीस कारवाई करू शकतात, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

पर्यटन हा गोव्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. पर्यटनामुळे अनेकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या रोजगार प्राप्त झालेला आहे. त्यामुळे पर्यटकांची सुरक्षा महत्त्वाची आहे व सरकार आता त्यासाठी पुढाकार घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या विधानातून स्पष्ट झाले आहे.

याच भेटीच्या दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राज्यात दारू पिऊन गाडी चालविणाऱयांवर कडक कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले. रात्री 10 नंतर राज्यात वाहन चालकांची तपासणी केली जाईल. आठ दिवसांपूर्वी पहाटे 4 वा. झालेल्या अपघातात बेळगाव येथील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता तर कोलव्यात विधानसभा निवडणुकीदरम्यान नाकाबंदी करीत असलेल्या दोन पोलिसांना एका वाहनाने ठोकर दिल्याने दोन्ही पोलिसांना जागीच मृत्यू आला होता. या वाहनाचा चालक दारूच्या नशेत होता. मद्यपान करून वाहन चालविणे थांबविण्यासाठी रात्री 10 नंतर कडक मद्य मीटर तपासणी केली जाईल. मद्यप्राशन करून वाहन चालविण्याला पूर्णपणे आळा घालण्यासाठी आम्ही आमच्या पोलीस कायद्यात सुधारणा करण्याचा विचार करीत आहोत. कोणीही मद्यपान करून वाहन चालवू शकणार नाही, जो स्वतःसाठी सुरक्षिततेचा उपाय असेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

महेश कोनेकर

Related Stories

भारतीय वन्यजीव सप्ताह

Amit Kulkarni

लॉकडाऊनचे गांभीर्य कळतंय पण वळत नाही

Patil_p

कुठे गेले मदतसाहित्याचे शेकडो ट्रक ?

Patil_p

पांढऱया कपाळाची लढाई!

Patil_p

महाकवी कालिदासाचे ‘अभिज्ञान शाकुंतलम्’ (40)

Patil_p

नाते… आजी-आजोबा आणि नातवांचे

Patil_p