सर्वसामान्य जनतेचा प्रश्न : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील काम तब्बल दोन महिन्यांनंतरही अर्धवट, तातडीने पूर्ण करण्याची मागणी


बेळगाव : रस्त्याचे किंवा इतर कोणतेही सार्वजनिक काम असेल तर सरकारी कंत्राटदार कशा प्रकारे वेळकाढूपणा करतात, याचा प्रत्यय आता अधिकाऱ्यांनाच येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याचे काम तब्बल दोन महिने सुरू आहे. मात्र अजून 50 टक्केही काम झाले नाही. अत्यंत रहदारीच्या ठिकाणी आणि सरकारी कार्यालयाच्या समोरीलच रस्त्याचे काम अशा प्रकारे सुरू आहे. त्यावरून इतर ठिकाणचे काम कशा प्रकारे होत असेल, याचा अनुभव आता अधिकाऱ्यांनाच येऊ लागला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ते जुने जिल्हा पंचायत कार्यालयापर्यंतचा 100 मीटरपर्यंतचा रस्ता तब्बल दोन महिने झाले तरी अर्धवट आहे. जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पंचायतीच्या अधिकाऱ्यांसमोरच या रस्त्याचे काम सुरू आहे. कासवापेक्षाही संथगतीने हे काम सुरू असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. कामाचा दर्जा तर नाहीच उलट कामही वेळेत होत नाही. यामुळे अधिकारी हे पाहूनही कसे मूग गिळून गप्प आहेत, याबद्दलही जोरदार चर्चा सुरू आहे.
अधिकाऱ्यांकडून कंत्राटदाराला सूचना नाही
सतत गजबजलेल्या आणि जिल्ह्याच्या मुख्य कार्यालयासमोरीलच रस्त्याचे काम अशा प्रकारे सुरू असताना अधिकारी कंत्राटदाराला काहीच सूचना करत नाहीत. यामुळे नेमके चाललंय तरी काय? असा प्रश्नदेखील आता उपस्थित होऊ लागला आहे. अनेकवेळा पाण्याच्या पाईप फुटल्या. कोणतेही नियोजन नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सर्वच रस्त्यांची अर्धवट खोदाई करून ठेवण्यात आली. दोन्ही बाजूने रस्ते अडविण्यात आले. त्यामुळे सरकारी कार्यालयाकडे फिरणेदेखील अवघड झाले आहे.
नेमके चाललंय तरी काय?
या सरकारी कार्यालयांजवळच न्यायालय आहे. न्यायालयामध्ये ये-जा करण्यासाठी वकील तसेच पक्षकारांना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळेदेखील तीव्र संताप व्यक्त होत आहे. वास्तविक महिन्याभरात हे काम पूर्ण झाले पाहिजे. मात्र दोन महिने उलटले तरी अजूनही काम अर्धवट आहे. यामुळे नेमके चाललंय तरी काय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.