नवोदय विद्यालयात पात्र ठरुनही : कुर्टीची ‘सानिध्या’ अपात्र
प्रतिनिधी / फोंडा
जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी तिने वर्षभर जीवतोड मेहनत केली. प्रवेश परीक्षेत ती उत्तीर्णही झाली व प्रवेश तक्त्यावर तिचे नावही आले. पात्र ठरुनही आता तिला वाळपईच्या नवोदय विद्यालयात प्रवेश दिला जात नाही. कारण ती कुर्टी-फोंडा येथील रहिवासी आहे व फोंडा हे प्रशासकीयदृष्टय़ा दक्षिण गोव्यात येते. कु. सानिध्या शरथचंद्र नायक असे या विद्यार्थीनीचे नाव असून प्रशाकीय चुकीची शिक्षा म्हणून पात्र होऊनही अपात्र होण्याची वेळ तिच्यावर आली आहे.
कुर्टी येथे राहणाऱया सानिध्या नायक हिने वाळपई येथील जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी वर्षभर तयारी केली. गेल्या 20 मे रोजी तिच्या पात्रता परीक्षेचा निकाल आला व यादीत तिचे नावही आले. पण जेव्हा प्रत्यक्षात तिने वाळपईच्या नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अर्ज दाखल केला तेव्हा तिला व तिच्या पालकांना धक्काच बसला. कारण ती फोंडय़ाची राहणारी असून फोंडा हे प्रशासकीयदृष्टय़ा उत्तर गोव्यात नव्हे तर दक्षिण गोव्यात येते.
विशेष म्हणजे परीक्षेला बसताना विद्यालयाकडून हा दक्षीण उत्तरचा प्रश्न कुठेच उपस्थित केला नव्हता. त्यावेळी पात्रता परीक्षेसाठी तिचे ओळखपत्र व अर्ज स्वीकारण्यात आले व तिला परीक्षेला बसण्यास विद्यालयाकडून कुठल्याच हरकतीविना मान्यता मिळाली. आता प्रत्यक्षात परीक्षा उत्तीर्ण होऊन, प्रवेशास ती पात्र ठरली तेव्हा हा मुद्दा का उपस्थित झाला, याचे उत्तर अद्याप विद्यालयाकडून मिळालेले नाही.
दि. 29 जूनपासून तिने अनेकवेळा विद्यालयाच्या प्राचार्यांना ई मेलवर अर्ज पाठविले. पण त्याला ठोस उत्तर आलेले नाही. उत्तर गोव्याच्या खासदारांची भेट घेऊन तिने या प्रकरणी दाद मागितली. तेथूनही कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. आता शाळाही सुरु झाली आहे, पण तिला प्रवेश काही मिळालेला नाही. नवोदय विद्यालयात जाण्याचे सानिध्याचे स्वप्न एका प्रशासकीय चुकीमुळे चक्काचूर झाले आहे. आता शेवटची आशा म्हणून विद्यालयाचे प्रशासकीय प्रमुख असलेल्या जिल्हाधिकाऱयांनी या प्रकरणात लक्ष घालून आपल्या मुलीला न्याय द्यावा अशी मागणी तिच्या पालकांनी केली आहे.
सानिध्या हिच्यापुढे आता एकच मार्ग उरला आहे. वर्षभर जीवतोड मेहनत घेऊन प्रवेश परीक्षेसाठी केलेल्या तयारीवर पाणी सोडून आपले शैक्षणिक वर्ष घालवण्याचे. तिची काहीच चूक नसताना, केवळ एका प्रशासकीय चुकीमुळे…! जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेऊ पाहणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी यापुढे या दक्षीण उत्तरेच्या प्रशसाकीय नियमांपासून बोध घ्यावा…!