125 किलो वजनाच्या कार्यकर्त्याचे पोट पाहून ममतांची मिश्कील टिप्पणी
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्या नगरपालिका कर्मचारी सुरेश अग्रवाल यांना त्यांचे वाढलेले पोट पाहून ‘तुमचे ‘मध्यप्रदेश’ इतके का वाढतेय’ असे म्हणत असल्याचे दिसून येत आहे.
या कार्यक्रमात सुरेश अग्रवाल स्वतःचे म्हणणे मांडण्यासाठी उभे राहिले होते. तुमच्याकडे इतका मोठा ‘मध्यप्रदेश’ कसा असू शकतो? ज्याप्रकारे तुमच्या पोटावर आकार वाढतोय ते पाहता तुम्ही एकदिवशी कोसळाल असे ममतांनी त्यांना उद्देशून म्हटले आहे. पोट शरीराच्या मध्यभागी असल्याने ममतांनी मध्यप्रदेशशी पोटाची तुलना केली आहे.
सुरेश यांचे मजेशीर उत्तर
ममता बॅनर्जी यांच्याकडून बॉडी शेमिंगयुक्त टिप्पणी झाल्यावरही सुरेश नाराज झाले नाहीत. ममतांनी सुटत चाललेल्या पोटाचे रहस्य काय असे विचारले होते. यावर त्यांनी मी दररोज 90 मिनिटांपर्यंत क्यायाम करतो, परंतु त्याचबरोबर दररोज सकाळी भजी खातो, असे उत्तर दिले होते. ममतांनी यावर दररोज भजी खाल्लात तर तुमचे वजन कधीच कमी होणार नसल्याची टिप्पणी केली आहे.
125 किलो वजन
माझे वजन 125 किलो असूनही मला रक्तदाब तसेच मधुमेहाची समस्या नसल्याचे सुरेश यांनी ममता बॅनर्जींना उद्देशून सांगितले. ममतांनी यावर तुम्ही कुठला व्यायाम करता असे विचारले होते. अग्रवाल यांनी दररोज प्राणायम आणि कपालभाति करत असल्याचे म्हटले.
…तर 10 हजार देईन
तुम्ही कपालभाति करत असाल यावर माझा विश्वास नाही. तुम्ही जर 1 हजार कपालभाति करून स्वतःच्या तंदुरुस्तीचे प्रदर्शन केल्यास मी तुम्हाला 10 हजार रुपये देईन असे ममता म्हणाल्या. यावर अग्रवाल यांनी कपालभाति केवळ सकाळी लवकर किंवा संध्याकाळी 5 वाजल्यानंतरच करणे योग्य असल्याचे म्हणत वेळ मारून नेली.