वेळ्ळी – कुटबण मत्स्योद्योग सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव : समुद्रात भिंत उभारण्याची मागणी
प्रतिनिधी /कुंकळ्ळी
वेळ्ळी-कुटबण मत्स्योद्योग सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तीन महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. त्यात साळ नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते त्या ठिकाणी रूंदीकरण करावे, असा ठराव मंजूर करण्यात आला. साळ नदीच्या मुखाशी लाटांचे तडाखा बसत असल्याने ट्रॉलर मासेमारीसाठी समुद्रात नेणे व परतणे धोकादायक होत असते.
साळ नदीच्या मुखाशी पावसाळ्यात लाटांचे तडाखे बसत असल्याने बहुतांश ट्रॉलर्स यंदा बंदी उठून मोसम सुरू झाल्यानंतरही बराच काळ समुद्रात जाऊ शकले नव्हते. या ठिकाणी ट्रॉलर बुडण्याचे प्रकारही घडलेले आहेत. या ठिकाणी रुंदीकरण करा अशी मागणी ट्रॉलरमालक व संस्थेकडून मागील 35 वर्षे केली जात आहे. अद्याप याकडे गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. यासंबंधी बैठकीत बरीच चर्चा झाली. संस्थेचे सदस्य क्रूझ सिल्वा हे आता आमदार झाले असून ते यावेळी उपस्थित होते. त्यांनी आपण हा विषय सरकारच्या निदर्शनास आणला आहे व पुन्हा सरकारकडे तशी मागणी करू, असे बोलताना सांगितले.
दुसरा ठराव समुदात कृत्रिम भिंत उभारावी, असा मागणी करणारा असून यामुळे ट्रॉलर योग्य व सुरक्षित जागेत नांगरून ठेवण्यास मोठी मदत होईल आणि कुटबण जेटीवरील ताण कमी होईल, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. कारवार बंदर व सीबर्ड येथे हा प्रकार पाहायला मिळतो. त्याच प्रकारे येथेही व्यवस्था करण्यात यावी. हा ठराव सरकारकडे पाठवला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. कुटबण जेटीवर मोठय़ा प्रमाणात व्यवहार वाढले असून जेटी अपुरी पडत आहे व ट्रॉलर्सवरील मासळी उतरविणे अडचणीचे होऊ लागले आहे. येथील व्यवहार सुरळीत होण्याच्या दृष्टीने समुद्रात कृत्रिम भिंतीची उभारणी करण्याची आवश्यकता सदस्यांनी उचलून धरली.
याशिवाय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने संस्थेच्या ज्या सदस्यांना 75 वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांना आणि ज्या सदस्यांचे निधन झाले आहे त्यांच्या कुटुंबियांना 50 हजार रु. देण्याचा ठराव घेण्यात आला. अन्य बरेच विषय यावेळी चर्चेला येऊन त्यावर सदस्यांकडून चर्चा झाली. संस्थेला 2020 साली 8 लाख रुपयांचे नुकसान झाले होते, तर 2021 साली 1 लाख 73 हजार रुपयांचा फायदा झाला. सर्वाधिक 28 लाख 71 हजारांचा नफा यंदा झाला असल्याचे अध्यक्ष विनय तारी यांनी सभेत अहवाल सादर करताना सांगितले. यावेळी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून मंजूर करण्यात आला.
आमदार, पंचाचा सत्कार
संस्थेचे सदस्य क्रूझ सिल्वा हे आमदार झाल्यामुळे त्यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन अध्यक्ष व संचालक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सदस्या जोसलिन मिनेझिस यांची पंच म्हणून निवड झाल्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संचालक अजित चोडणकर, व्हिक्टर गुर्जांव, अलका जुवटकर, विनय तारी, आमदार क्रूझ सिल्वा, विजय जुवेकर, जुआंव फर्नांडिस उपस्थित होते. याप्रसंगी सदस्यांच्या गुणवंत मुलांचा गौरव आमदार क्रूझ सिल्वा यांच्या हस्ते प्रत्येकी 10 हजारांचा रोख पुरस्कार देऊन करण्यात आला. यात 10 वी, 12 वी आणि पदवी परीक्षांत सर्वाधिक गुण मिळविलेल्या श्रीथी कोचरेकर, रूथ कोचरेकर, दिशा तारी, सुहानी जोशी, श्रेया तोरस्कर, महीम जुवटकर यांचा समावेश राहिला. सूत्रसंचालन विनय तारी यांनी केले.