केंद्रीय महामार्ग व्यवस्थापनाकडून गोवा सरकारला पत्र
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-गोवा व्हाया चोर्ला या महामार्गाच्या रुंदीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. या महामार्गासाठी अंदाजे 200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. केंद्रीय महामार्ग व्यवस्थापनाकडून गोवा सरकारला पत्र देण्यात आले असून लवकरच कामाला सुरुवात केली जाणार आहे. रस्त्याचे रुंदीकरण होऊन प्रवास सोयीचा होणार असला तरी यामुळे महामार्गालगत असणारी घरे व व्यावसायिकांवर संक्रांत येणार आहे.
चोर्लामार्गे गोवा हा जवळचा रस्ता असल्याने वाहनचालकांकडून या मार्गाला पहिली पसंती दिली जाते.
त्यामुळे शेकडो वाहने यामार्गे साखळी, म्हापसा, पणजी येथे जातात. परंतु कणकुंबीपासून गोव्यापर्यंतचा रस्ता अत्यंत अरुंद आहे. त्यामुळे बऱयाचवेळा वाहनांचे अपघात होत आहेत. याची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. रुंदीकरण झाल्यास पुणे-बेंगळूर या राष्ट्रीय महामार्गाला बेळगाव-गोवा हा मार्ग जोडला जाणार असून यामुळे वाहतूक सुलभ होणार आहे.
मध्यंतरी केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बेळगाव-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचा शुभारंभ केला होता. बेळगावमधील पिरनवाडीपासून गोक्यापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या रुंदीकरणासाठी अंदाजे 200 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. चारपदरी रस्ता होणार असल्याने पुढील काळात बेळगाव-गोवा प्रवासाचा वेळ आणखी कमी होणार आहे.
रुंदीकरणासाठी घरांवर संक्रांत
पिरनवाडी ते गोवा यादरम्यान बेळगाव तालुक्मयातील पिरनवाडी, किणये, कुसमळी, जांबोटी, कणकुंबी, गोवा राज्यातील केरी, मोर्ले, साखळी गावांमधील महामार्गानजीकच्या घरांवर संक्रांत येणार आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. हा मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात येत असून गोवा सरकारला तसे पत्र पाठविण्यात आले आहे.