मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती ; दहा ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट सुरू
पणजी : प्रत्येक घराला इंटरनेट नेटवर्कने जोडणारी ’हर घर फायबर’ योजना सुरू करण्याच्या तयारीत सरकार असताना, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकतेच पाच मतदारसंघांत 10 ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट सुरू केले. लवकरच राज्यातील प्रत्येक मतदारसंघात असे हॉटस्पॉट सुरू करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत, आम्ही गोव्यात पाच मतदारसंघांमध्ये वायफाय हॉटस्पॉट्स सुरू केले आहेत. जेथे लोक अखंड डिजिटल कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करू शकतात, असे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारने यापूर्वीच ’हर घर फायबर’ योजनेसाठी पुढाकार घेतला आहे, ज्या अंतर्गत प्रत्येक कुटुंब इंटरनेट नेटवर्कशी जोडले जाईल, असे ते पुढे म्हणाले.
पाच ठिकाणी वायफाय सुरु
काल शुक्रवारी सांखळी, पर्वरी, ताळगाव, बाणावली आणि डिचोलीत वायफाय हॉटस्पॉट सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यासंबंधी यापूर्वीच विधानसभा अधिवेशनात सर्व मतदारसंघ वायफायने जोडले जातील असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार, आमदारांनी आधीच हॉटस्पॉट ओळखण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. या योजनेत सर्व सार्वजनिक ठिकाणे आणि शासकीय कार्यालये समाविष्ट करण्यात येणार आहेत. इंटरनेट हा मूलभूत अधिकार बनला आहे. आता सर्व काही ऑनलाइन वर्किंग इकोसिस्टममध्ये बदलत असताना प्रत्येक घरात आणि सार्वजनिक ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी असणे महत्त्वाचे असल्याचे सरकारचे मत बनले आहे.