केंद्र सरकारकडून तीन हेलिकॉप्टर्सची मदत : दिवसभर हेलिकॉप्टरमधून केली पाण्याची फवारणी : वनखाते, अग्निशामकसह खासगी कार्यकर्त्यांचीही मदत
प्रतिनिधी / पणजी
राज्यात गेले सात-आठ दिवस चालू असलेले अग्निचे तांडव हळुहळू नियंत्रणात येत आहे. गुरुवारी संरक्षण खात्याच्या तीन हॅलिकॉप्टर्समधून विविध ठिकाणी पाण्याची फवारणी करून आग आटोक्यात आणली आहे. तरीही सायंकाळपर्यंत राज्यभरात सात ठिकाणी आगीचे वणवे चालू होते. साट्रे, देरोडे, अनमोड घाट, शिगाव, कालय, काटेमळ-काले, पोत्रे-नेत्रावळी व धारबांदोडा या ठिकाणी जंगलांमध्ये आगी चालू आहेत. हजारो झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. वनमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले की, 797 माणसे आग विझविण्याच्या कामाला लागली आहेत. राज्याचे कार्यकारी प्रधान मुख्य वनपाल सौरभ कुमार तसेच मुख्य सचिवांबरोबर आपण चर्चा करून नंतर त्यांना हॅलिकॉप्टर्समधून संपूर्ण भागाचा दौरा करून अहवाल देण्यास सांगितले आहे.


राज्यातील जंगलांमध्ये सुरू झालेला आगीचा वणवा नियंत्रणात आणणे शक्य झाले आहे. तथापि संपूर्णत: आग विझलेली नाही अशी माहिती वनमंत्री राणे यांनी दिली. सध्या आम्ही आग विझविण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यास तयार आहोत. वनखात्याचे सुमारे 800 कर्मचारी आग आटोक्यात आणण्याच्या कामात गुंतलेले आहेत. अग्निशामक दलाचे कर्मचारी व अधिकारी देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहेत. मंत्री राणे यांनी सत्तरीतील आपल्या कार्यकर्त्यांना पारंपरिक पद्धतीने आग आटोक्यात आणण्याच्या कामी डोंगरावर पाठविले असून त्यांची ही मोहीम यशस्वी झाली आहे.
सात ठिकाणी आग सुरूच
दैनिक ‘तऊण भारत’शी बोलताना राणे म्हणाले की, आग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आलेली आहे. परंतु दुपारी उशिरापर्यंत 7 ठिकाणी आगी चालूच होत्या. सलग तिसऱ्या दिवशी नौदलाच्या तीन हॅलिकॉप्टर्सद्वारे पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. जोरदार वारे आणि तापलेले वातावरण यामुळे आगीचा वणवा पसरत गेलेला, आहे असे ते म्हणाले.
कारणे शोधू, नुकसानीचा आढावा घेणार
गोव्यात अशा प्रकारची लागलेली आग हा पहिलाच अनुभव आहे तरीदेखील आवश्यक ती सारी यंत्रणा राबविल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र या वणव्यामुळे वनखात्याचे व निसर्गाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. सध्या आम्ही आग आटोक्यात आणण्याचे काम करत आहोत. त्यानंतर आगीची कारणे शोधू. शिवाय यातून केवढी नुकसानी झाली, याचा आढावादेखील आम्ही घेणार आहोत, असे मंत्री पुढे म्हणाले.
सांखळी, चिखली, मोलेत आग
काल गुरुवारी हरीवाडा विठ्ठलपूर सांखळी भागातही दुपारी आग लागली. दुपारी वाराही सुटला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी आगीचा वणवा पसरला. डिचोली अग्निशामक दलाने तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. सायंकाळी त्यांना त्यात यश आले. तोपर्यंत अनेक झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. चिखली येथेही अशाच पद्धतीने आगीचा वणवा पसरला. अग्निशामक दलाच्या जवानांनी तिथेही जोरदार प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली. मोले, धारबांदोडा भागात दुपारी लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाने प्रयत्न चालू केले होते. मात्र सर्वत्र आग चालू होती. आगीच्या घटना कधी बंद होणार, याची चिंता सर्वांना लागून राहिली आहे.