सुकृत मोकाशी / पुणे :
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात आजारी असतानाही खासदार गिरीश बापट सहभागी झाल्याने राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे. मात्र, आजारी बापट यांना प्रचाराच्या रणधुमाळीत उतरवण्याची भाजपची खेळी कितपत यशस्वी ठरणार का, हे निकालाअंतीच कळणार आहे.
कसबा विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या जागेसाठी 26 फेब्रुवारीला पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडून हेमंत रासने, तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांच्यात थेट निवडणूक होत आहे. कसबा हा कायमच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. पोटनिवडणुकीतही भाजपनेही आपला गड राखण्यासाठी कंबर कसली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे तळ ठोकून आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कसब्यात लक्ष घातले आहे. तरीही गेल्या काही दिवसात काँग्रेसचे उमेदवार रवींद धंगेकर यांनी प्रचारात घेतलेल्या आघाडीमुळे कसब्यातील जागा अडचणीत आल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने पाच वेळा कसब्याचे आमदार राहिलेले आणि कसब्याचा ‘हुकमी एक्का’ अशी ओळख असणारे गिरीश बापट यांना आजारपणात प्रचारासाठी मैदानात उतरायला भाग पाडले.
भाजपने टिळक कुटुंबीयांना डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने आधीच ब्राह्मण समाजामध्ये नाराजी होती. त्यात गिरीश बापट प्रचारापासून लांब होते. भाजपने रासने यांना रिंगणात उतरवल्याने ब्राह्मण मतदारांच्या नाराजीचा फटका बसू शकतो, अशी शक्यता लक्षात घेऊन भाजपने गिरीश बापट यांना प्रचारात उतरवण्याची खेळी भाजपने खेळली. नाकाला नळी, हातात ऑक्सिमीटर आणि व्हिलचेअरवर बसलेले बापट यांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता प्रचारात आणले गेले. बापटांना अशा अवस्थेत पाहून अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.
आजवर कसब्यात भाजपकडून ब्राह्मणच आमदार निवडून आले आहेत. बापट यांनी सहा टर्म या भागाचे नेतृत्व केले. नंतर ते खासदार झाले. बापट यांना मानणारा मोठा वर्ग इथे आहे. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे या वेळी प्रचारात येऊ शकत नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र ब्राह्मणांच्या नाराजीमुळे ही जागा संकटात येत असल्याचे पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरी जाऊन बापट यांना गळ घातली. उपमुख्यमंत्र्यांनी गळ घातल्यावर चोवीस तासाच्या आतच बापट प्रचारात सक्रिय झाले व त्यांनी पक्षनिष्ठा राखली.
पर्रिकरांची आली आठवण
नाकाला नळी, हातात ऑक्सिमीटर आणि व्हिलचेअर बसलेले बापट यांना अशा अवस्थेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणले गेले तेव्हा अनेकांना गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची आठवण झाली. बापट आजारी असताना त्यांना प्रचारात उतरवून भाजपाचे कसबा जिंकण्याचे मनसुबे पूर्ण होतील का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.