गुगल कर्मचाऱयाच्या दाव्यामुळे खळबळ, गुगलकडून इन्कार
नवी दिल्ली
गुगल एका आर्टिफिशियल चॅटबॉट (एआय) टेक्नॉलॉजीवर काम करत आहे. यासाठी कंपनीने डीप माइंड प्रोजेक्ट आणला आहे. एआय हे तंत्रज्ञान आता विकासाच्या अंतिम टप्प्यावर आले असून गुगल मानवाप्रमाणे विचार करु शकतो, असा दावा याच कंपनीचे कर्मचारी मानोईन ब्लॅक यांनी केल्याने गुगलच्या ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. ब्लॅक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
गुगलवर एखादा प्रश्न टाकल्यास आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे किंवा आपल्या मनात असेल त्याप्रमाणे उत्तर मिळते असे ब्लॅक यांचे म्हणणे आहे. यावरुन गुगलने हे तंत्रज्ञान शोधले असून ते मानवाच्या मनाचा ठाव घेऊ शकते, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली असून त्यावर अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत.
मात्र ही केवळ अफवा असून अशा प्रकारचे कोणतेही तंत्रज्ञान गुगलकडून विकसीत केले जात नाही, असे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले. ब्लॅक यांना जबरदस्तीने सुट्टीवर पाठविण्यात आलेले आहे. तथापि, ब्लॅक हे आपल्या दाव्यावर ठाम आहेत. आपण या तंत्रज्ञान विकासाची बाब उघड केल्यानेच आपल्याला घरी बसविण्यात आले, असा त्यांचा नवा दावा असल्याने वाद मिटलेला नाही.
एआय चॅटबॉट मानवाप्रमाणे विचार करतो
ब्लॅकवर आरोप करण्यात आले आहेत, की त्याने कंपनीची गुपिते तिसऱया व्यक्तीसमोर फोडली आहेत. तसेच कंपनीबद्दल संशय निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्ये जाहीररित्या त्यांनी केल्याचे समजते. एकंदरीत हा सर्व प्रकार सर्वसामान्यांना गोंधळात टाकत आहे.