Tarun Bharat

मराठी उमेदवारांना इतर जिल्हय़ात संधी मिळणार का?

शिक्षक भरतीत मराठी विद्यार्थ्यांची कसोटी

प्रतिनिधी /बेळगाव

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला असून शिक्षण विभागाने गुणवत्ता यादी जाहीर केली. बेळगाव जिल्हय़ात सीईटी उत्तीर्ण उमेदवारांची संख्या अधिक असल्यामुळे त्यांना बिदर, गुलबर्गा व बागलकोट या जिल्हय़ातील मराठी शाळांसाठी संधी मिळणार का? असा प्रश्न उमेदवारांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे शिक्षक भरतीचा मार्ग जरी मोकळा झाला असला तरी मराठी उमेदवारांची कसोटी लागणार आहे.

कर्नाटकात बेळगाव जिल्हय़ासह बिदर, गुलबर्गा व बागलकोट या जिल्हय़ांमध्ये मराठी शाळा आहेत. सीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी शिक्षण विभागाने बुधवारी जाहीर केली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 685 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामधील 87 जागा या मराठी माध्यमांसाठी दिल्या जाणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत समावेश झाला आहे. त्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी उपलब्ध जागांपेक्षा गुणवत्ता यादीतील शिक्षकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांना इतर जिल्हय़ांमधील मराठी शाळांमध्ये संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.

बिदर जिल्हय़ात 45 जागा भरून घेतल्या जाणार असून केवळ 17 विद्यार्थी सीईटी उत्तीर्ण आहेत. तर गुलबर्गा येथे मराठी शाळांसाठी 4 जागा उपलब्ध असून एकही विद्यार्थी उत्तीर्ण झालेला नाही. बागलकोट जिल्हय़ातही एकही विद्यार्थी उत्तीर्ण झाला नसून एक जागा रिक्त आहे. त्यामुळे बागलकोट, बिदर व गुलबर्गा येथील मराठी शाळांमधील शिक्षक भरतीत बेळगाव जिल्हय़ातील उत्तीर्ण परीक्षार्थींना संधी द्यावी, अशी मागणी होत आहे. कारण त्या जिल्हय़ांमध्ये उमेदवारच नसल्यामुळे मराठी शाळा बंद पडण्याची भीती असून मराठी शाळांच्या संवर्धनासाठी बेळगाव जिल्हय़ातील परीक्षार्थींना संधी मिळाल्यास उपयोग होणार आहे.

राज्यात 15 हजार जागा भरणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. यानुसार सीईटी उत्तीर्ण परीक्षार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली. 15 हजार शिक्षकांची भरती होणार असली तरी बेळगाव जिल्हय़ात मराठी माध्यमासाठी केवळ 87 जागा भरती केल्या जाणार आहेत. समाज विज्ञान, विज्ञान, गणित व मराठी या विषयांसाठी भरती केली जाणार आहे.

Related Stories

मंगाई मंदीर परिसरात ड्रेनेजचे पाणी

Patil_p

पिरनवाडी तलावासाठी योग्य नियोजनाची गरज

Amit Kulkarni

मुलांना छंदाकडे वळविण्याची गरज

Amit Kulkarni

एनईपीमुळे शिक्षणाचा दर्जा वाढेल

Amit Kulkarni

25 कर्नाटक बटालियन एनसीसीतर्फे स्वच्छता मोहीम

Amit Kulkarni

आश्रय घरकुलात अतिक्रमण; माहितीसाठी सर्वेक्षण

Amit Kulkarni
error: Content is protected !!