आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनला अधिक वेळ देण्याकडे कल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी आपण दुसऱया टर्मसाठी लढणार नसल्याचे बुधवारी जाहीर केले. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकारिणीची लवकरच निवडणूक होणार असून त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आंतरराष्ट्रीय हॉकी अध्यक्षपदाकरिता आणखी वेळ देता येण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले. पब्लिक फंडचा गैरवापर केल्याप्रकरणी मागील काही आठवडय़ांपासून त्यांची सीबीआय चौकशी सुरु आहे.
नरिंदर बात्रा यापूर्वी 2017 मध्ये भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. आगामी निवडणुकीत ते पुन्हा रिंगणात उतरु शकतात. पण, त्यांनी आपण रिंगणात उतरणार नसल्याचे जाहीर केले असून या निर्णयामुळे त्यांचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीतील स्थानही राहणार नाही. बात्रा यांची 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीत वर्णी लागली होती.
‘आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये बरेच उपक्रम राबवले जात असून एफआयएच नेशन्स कप, विविध फॅन एन्गेजिंग प्लॅटफॉर्मचा त्यात समावेश आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचा अध्यक्ष या नात्याने या सर्व उपक्रमासाठी पुरेसा वेळ देणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे’, याचा बात्रा यांनी येथे उल्लेख केला.