आजपासून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी : मनपाच्या कारवाईकडे शहरवासियांचे लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक बंदीची सूचना केली आहे. यानुसार 1 जुलैपासून प्लास्टिक बंदीच्या कारवाईला प्रारंभ होणार आहे. महापालिकेने जनजागृती मोहीम हाती घेतली असून प्लास्टिक पिशव्यांची विक्री किंवा वापर केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे. मात्र ही कारवाई काटेकोरपणे होणार की फार्स ठरणार? याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
यापूर्वी राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली होती. 2018 पासून सातत्याने प्लास्टिकविरोधी कारवाई करून प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला होता. प्लास्टिक विपेत्यांवर कारवाई करून दंड आकारणी केली होती. मात्र, कारवाईची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली नाही. कर्नाटकात प्लास्टिक बंदी केली असली तरी परराज्यातून प्लास्टिकचा साठा येत होता. त्यामुळे स्थानिक उत्पादनावर बंदी घातली असली तरी परराज्यातून येणाऱया प्लास्टिक पिशव्यांच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आले नव्हते. त्यामुळे प्लास्टिक बंदी केवळ फार्स ठरली होती. सातत्याने कारवाई करून प्लास्टिक बंदीसाठी बरेच उपक्रम हाती घेण्यात आले. पण प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यास शासनाला यश आले नाही.
आठ दिवस जागृती मोहीम ः त्यानंतर कारवाई
आता केंद्रशासन आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. कायद्यातील तरतुदीनुसार प्लास्टिकचे उत्पादन, साठा, विक्री आणि खरेदी करणाऱयांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना केली आहे. त्यामुळे बेळगाव महापालिकेने प्लास्टिकविरोधी मोहीम राबविण्यासाठी जनजागृती करण्यास प्रारंभ केला आहे. तसेच प्लास्टिकचा वापर केल्यास कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल, अशा इशारा दिला. प्रारंभी आठ दिवस जागृती मोहीम राबवून त्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. प्लास्टिकविरोधी कारवाई यापूर्वी काटेकोरपणे झाली नाही. मात्र यापुढे तरी अंमलबजावणी काटेकोरपणे होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.