उपसरपंच, पंचांकडून अधिकाऱयांसह पाहणी
प्रतिनिधी /काणकोण
पैंगीण पंचायत क्षेत्रातील वेलवाडा, वीरगाळ येथील पुरातन अशा तळीतील गाळ काढून त्या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची सोय करण्याचे नवीन पंचायत मंडळाने ठरविले असून पैंगीण कोमुनिदादीचे अध्यक्ष दामोदर फळगावकर, पैंगीणचे उपसरपंच सुनील पैंगणकर, स्थानिक पंच सतीश पैंगीणकर तसेच पासल वॉर्डाचे पंच महेश नाईक यांनी जलस्रोत खात्याचे अभियंता परवार, नमशीकर यांच्यासह या भागाची पाहणी केली.
यावेळी सदर वॉर्डातील काही प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. येत्या गणेश चतुर्थीपूर्वी या तळीच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण केले जाईल, असा विश्वास पंचायत मंडळाने व्यक्त केला आहे. याशिवाय हत्तीपावल ते कचरा प्रक्रिया प्रकल्पापर्यंत वीजखांबे उभारून त्या ठिकाणी विजेची सोय करणे, पैंगीणच्या स्मशानभूमीजवळ पाण्याची सुविधा तयार करणे त्याचप्रमाणे या ठिकाणी उभारण्यात येणाऱया जलकुंभाचे काम लवकरात लवकर सुरू करायला लावणे यासाठी पंचायत मंडळ प्रयत्नशील असल्याची माहिती उपसरपंच सुनील पैंगणकर यांनी यावेळी दिली.
पैंगीण पंचायत मंडळाने विविध विकासकामे राबविण्याकडे लक्ष दिले असून सभापती रमेश तवडकर यांच्या सहकार्याने अनेक प्रकल्प चालीस लागतील, अशी अपेक्षा मंडळाने व्यक्त केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मागणी होत असलेली पैंगीण बाजारातील गटाराची दुरुस्ती मार्गी लावून पावसाच्या पाण्याला व्यवस्थित वाट करून देण्याचे काम पंचायतीकडून पूर्ण करण्यात आले आहे. सरपंच सविता तवडकर यांनी या कामाकडे स्वतः लक्ष दिले. पैंगीण बाजारात असलेल्या गालजीबाग पुलाच्या किरकोळ दुरुस्तीच्या आणि रस्ता रूंदीकरणाच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांनी नुकतीच पाहणी केलेली आहे.