आफताब पूनावालाच्या पॉलिग्राफ चाचणीला अनुमती ः घटना भावनेच्या भरात घडल्याचा वकिलाचा दावा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीत घडलेल्या आणि देशभरात गाजत असलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचा धागादोरा लागल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी तिच्या जबडय़ाचा काही भाग हाती लागला होता. या भागात रुट कॅनॉल असल्याचे तपासात आढळले आहे. रुट कॅनॉल किंवा दाताच्या शिरेवरून तिची ओळख पटण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे तज्ञांचे मत आहे.
नव्या तपासात अफताब पुनावाला याच्या बाथरुममध्ये रक्ताचे डाग आढळले आहेत. त्यांची गुन्हा वैज्ञानिक तपासणी करण्यात येत असून ते श्रद्धाच्या रक्ताचेच असावेत असा संशय पोलिसांना आहे. तिच्या रक्ताशी हे डाग जुळल्यास पुनावाला विरोधात महत्त्वाचा पुरावा पोलिसांना मिळणार आहे. रुट कॅनॉलवरुनही शोध सुरु असून वालकर हिच्या दंतचिकित्सकाकडे चौकशी केली जाणार आहे. सर्वसाधारणपणे दंतचिकित्सक आपल्या रुग्णाच्या दातांच्या स्थितीची नोंद ठेवतात. त्यामुळे श्रद्धाच्या रुट कॅनॉलवरुन तिची ओळख पटण्याची शक्यता आहे.
घटना भावनेच्या भरात
आरोपी अफताब याला दिल्लीतील न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित ठेवण्यात आले. त्याच्या वकीलाने ही घटना भावनेच्या भरात आणि क्षणिक रागापोटी घडल्याची कबुली दिली, असे सांगण्यात येत आहे. हा हेतुपुरस्सर केलेला खून नाही, असे त्याच्या वकीलाचे म्हणणे होते. मात्र, न्यायालयाने ते न मानता, अफताबच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्याचा आदेश दिला. पोलिस या प्रकरणात अद्यापही पुराव्यांचा शोध घेत आहेत. तपास पूर्णत्वास जात असल्याचे न्यायालयात स्पष्ट करण्यात आले.
पॉलिग्राफ चाचणीस अनुमती
आरोपीच्या नार्को चाचणीआधी त्याची नियमाप्रमाणे पॉलिग्राफ चाचणी होणे आवश्यक आहे. त्यानुसार न्यायालयाने मंगळवारी सुनावणीच्या वेळी या चाचणीला अनुमती दिली आहे. एक दोन दिवसांमध्ये ही चाचणी केली जाईल. त्यानंतर नार्को चाचणी घेण्यात येईल, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे.
जबडा फोडण्यासाठी खिळे, हातोडा
श्रद्धाचा जबडा फोडण्यासाठी अफताबने खिळे आणि हातोडय़ाचा उपयोग केल्याचे आढळून येत आहे. त्याचप्रमाणे हाडांचे तुकडे करण्यासाठी हेक्सा ब्लेडस् वापरल्याचे तपासात आढळून आले आहे. ही पाती त्याने ज्या दुकानातून विकत घेतली तेथे त्याला नेण्यात आले. त्याने तेथील पाती पाहून ती ओळखली आणि अशीच चार पाती आणि करवतीचा दांडा विकत घेतल्याची कबुली दिली आहे. मात्र, ही खरेदी त्याने केव्हा केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नसून दुकानातील पावत्या आणि नोंदींचा शोध घेतला जात आहे. गुन्हा घडून अनेक महिने लोटल्याने पुरावे गोळा करणे अधिक जटील झाले आहे.
नातेवाईकांना माहिती ?
अफताबचे आईवडील आणि इतर नातेवाईकांना ही हत्या घडण्यापूर्वीच ती होणार असल्याची माहिती होती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण हत्येच्या पूर्वी दोन आठवडे त्याच्या आईवडिलांनी वसईतील घर सोडून ते अन्य ठिकाणी रहावयास गेल्याचे दिसून आले आहे. ते कोठे रहावयास गेले हे शोधावे आणि त्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी श्रद्धाच्या वडीलांनी केली.