गेहलोत यांच्या नावाच्या चर्चेदरम्यान नेत्यांचे आवाहन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेसच्या अध्यक्षाच्या निवडणुकीचे काउंटडाउन सुरू झाले आहे, परंतु अद्याप कुठलाच चेहरा समोर आलेला नाही. राहुल गांधी यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे, तसेच काँग्रेस नेते त्यांनाच हे पद स्वीकारण्याचे आवाहन करत आहेत, परंतु त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिल्याचे समजते. याचदरम्यान पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना 2024 पर्यंत पक्षाध्यक्षपदी कायम राहण्याचे आवाहन केले आहे. गांधी परिवाराशिवाय अन्य कुणीच पक्षाला एकजूट ठेवू शकत नाही. प्रसंगी पक्षात फूट पडू शकते. प्रियांका वड्रा यांना 2024 नंतर पक्षाची धुरा देण्यात यावी असे या नेत्यांचे म्हणणे आहे.


तर सोनिया गांधी यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव सुचविल्याचे समजते. गांधी परिवारातील सदस्य अध्यक्ष न झाल्यास अशोक गेहलोत हे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची दाट शक्यता आहे. दोन नेत्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान अशोक गेहलोत यांनी याचे संकेत दिले आहेत. याचदरम्यान राहुल गांधी, प्रियंका वड्रा अन् सोनिया गांधी तिघेही विदेशात जाणार आहेत. सोनिया गांधी यांची वैद्यकीय तपासणी होणार असून त्यादरम्यान राहुल अन् प्रियंका वड्रा हे त्यांच्यासोबत असतील. पुढील काही दिवसांमध्येच काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख घोषित होणार आहे.
गांधी परिवाराचा सदस्य तयार न झाल्यास अशोक गेहलोत यांच्या गळय़ात पक्षाध्यक्ष पदाची माळ पडणार आहे. याचबरोबर मुकुल वासनिक, के.सी. वेणुगोपाल, कुमारी शैलजा, मल्लिकार्जुन खर्गे, भूपेश बघेल यांचेही नाव चर्चेत आहे. अध्यक्षाच्या निवडणुकीची प्रक्रिया 21 ऑगस्टपासून सुरू होत 20 सप्टेंबरपर्यंत चालणार असल्याचे काँग्रेसने यापूर्वी म्हटले होते. परंतु अद्याप राहुल गांधी यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली नाही. काँग्रेसने 7 सप्टेंबरपासून भारत जोडो पदयात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पदयात्रा 148 दिवस चालणार असून कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत याचे आयोजन होणार आहे. 5 महिन्यांच्या या यात्रेत 3,500 किलोमीटरचे मार्गक्रमण केले जाईल. दर दिनी 25 किलोमीटरचा पल्ला गाठला जाणार आहे.
काँग्रेस कार्यकारिणी बैठक रविवारी
काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक रविवारी आयोजित होणार असून यात पक्षाध्यक्ष निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमास मंजुरी दिली जाणार आहे. ही बैठक डिजिटल माध्यमातून पार पडणार असून सोनिया गांधी याचे अध्यक्षत्व करतील अशी माहिती पक्षाचे संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे.
अंतर्गत बदल झाले तरच…
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पुन्हा एकदा पक्षात अंतर्गत बदल घडवून आणण्याची गरज अधोरेखित केली आहे. पक्षात काही अंतर्गत बदल घडविण्यात आले तरच काँग्रेसला गतवैभव प्राप्त होऊ शकेल. काँग्रेसला गटबाजीतून बाहेर पडत एकजूट होण्याची गरज आहे. 2018 मध्ये राहुल गांधी यांना आम्ही अध्यक्ष म्हणून निवडले, परंतु त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्याकडून आम्ही राजीनामा मागितला नव्हता असे शर्मा यांनी म्हटले आहे. आनंद शर्मा अन् गुलाम नबी आझाद हे जी23 गटातील प्रमुख नेते आहेत. हा गट पक्षात मोठे बदल घडवून आणण्यासाठी अत्यंत आग्रही आहे.