वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती : कर्जातून भूमिगत केबलचे काम करणार
प्रतिनिधी /पणजी
वीज आणि उर्जा उत्पादनासाठी विविध साधनसुविधा मिळवून देता याव्यात म्हणून जायकाकडून रु. 2000 कोटींचे कर्ज घेण्यात येणार असल्याची माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. अत्यंत कमी अशा 1.5 टक्के व्याजदराने हे कर्ज मिळणार असून ते 25 वर्षात फेडायचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पत्रकारांशी बोलताना ढवळीकर यांनी सांगितले की, जपान इंटरनॅशनल सहकार एजन्सी (जायका) एक पथक गोव्यात आले होते, तेव्हा त्यांच्याकडे कर्जाविषयी चर्चा करण्यात आली. उर्जा व वीज खात्याचे प्रमुख अभियंते यांच्याकडेही त्या पथकाने चर्चा केली. त्यानंतर आपण जायकाकडून कर्ज घेण्याचा निर्णय केल्याचे ढवळीकर म्हणाले.
यापुर्वीच्या कर्जातून साकारले अनेक प्रकल्प
मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना 2002 मध्ये जायकाकडून रु. 1200 कोटींचे कर्ज घेण्यात आले होते. त्यातून पाणी पुरवठा प्रकल्प, सांडपाणी निचरा प्रकल्प यांची उभारणी करण्यात आली. ते प्रकल्प पूर्ण झाले असून त्याचा लाभ जनतेला होत आहे, असा दावा ढवळीकर यांनी केला.
नव्या कर्जातून भूमिगत केबलचे काम करणार
या नव्या कर्जातून भूमिगत केबलचे काम करण्यात येणार असून लोकांना अखंडित वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. साधनसुविधा प्रकल्पांसाठी कर्जे घेण्यात गैर काहीच नाही. त्यातून महसूल वाढतो आणि कर्जेही परतफेड करता येतात, अशी टिपण्णी त्यांनी केली. राज्य मंत्रिमंडळाकडून यासाठी मान्यता घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.