ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या जागेवर भाजपकडून कोणाला तिकीट मिळणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज या मतदारसंघातील उमेदवार निश्चितीसाठी बैठक बोलावली आहे. भाजपचे शहरातील सर्व प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
दिवंगत आ. मुक्ता टिळक यांच्या घरातच उमेदवारी देण्यात यावी, अशी इच्छा त्यांचे पती शैलेश टिळक यांनी व्यक्त केली आहे. पण शैलेश टिळक राजकारणात फारसे सक्रिय नाहीत. त्यामुळे त्यांचा मुलगा कुणाल टिळक याला उमेदवारी देण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. कसब्यातील उमेदवार निश्चितीसाठी चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड येथील निवासस्थानी थोडय़ाच वेळात शहरातील भाजप नेत्यांची बैठक सुरू होणार आहे. या बैठकीमध्ये भाजपकडून पोटनिवडणुकीसाठी रणनीती आखण्यात येईल. त्याचबरोबर या बैठकीत संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेली जातील. त्यानंतर त्यामधील एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : काँग्रेसचा राज्यात पुन्हा स्वबळाचा नारा
दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षानींही कंबर कसली आहे. कसबा हा काँग्रेसचा परपरांगत मतदारसंघ आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होताच काँग्रेसने निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली. या पोटनिवडणूकीसाठी आमदार संग्राम थोपटे यांची पक्षाच्या निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या पाच इच्छूक उमेदवारांची नावे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच हायकमांडकडे पाठवली आहेत.